रत्नागिरी : विधानसभेच्या निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात आज पहिल्या सहा तासांमध्ये सरासरी ३८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ४० टक्क्यांहून अधिक मतदान राजापूर मतदारसंघात नोंदविले गेले.
जिल्ह्यात आज, २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी शांततेत मतदान सुरू झाले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी रत्नागिरीच्या दामले विद्यालयातील केंद्रांवर मतदान केले. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी रत्नागिरी शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतदान केले. रत्नागिरीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाळ माने यांनी मिऱ्या येथे मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यात तरुणांबरोबरच शंभरी पार केलेल्या किंवा शंभरीकडे झुकलेल्या अनेक मतदारांनी उत्साहात मतदान केले. जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये असे उत्साही मतदार होते. अनेक ज्येष्ठ मतदारांनी कोणाच्याही आधाराशिवाय स्वतः जाऊन मतदान करण्याचा आग्रह धरला आणि तो पूर्ण करण्यात आला. दापोली मतदारसंघातील दाभोळ येथील ९८ वर्षीय वैद्यकीय व्यावसायिक मधुकर लुकतुके यांनी कोणाच्याही मदतीशिवाय स्वतः येऊन मतदान केले. ते अजूनही वैद्यकीय सेवा देतात. दापोली तालुक्यातीलच बोंडिवली येथील रामचंद्र महीमाजी साळवी या १०४ वर्षे वयाच्या मतदाराने मतदान केंद्रांवर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. कुटुंबीयांच्या मदतीने ते मतदान केंद्रावर आले. राजापूर मतदारसंघातील ९५ वर्षे वयाच्या एका मतदाराने खणखणीत आवाजात आणि स्वतः चालत येऊन मतदान केले. चिपळूण मतदारसंघातील श्रीमती पार्वतीबाई गोपाळ कासार यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी स्वतः कोणाच्याही मदतीशिवाय खेर्डी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
जिल्ह्यातील तीन टप्प्यांमधील मतदानाची टक्केवारी
वेळ सकाळी ७ ते ९
जिल्ह्याची टक्केवारी – ८.९६%
मतदारसंघ टक्केवारी
१) दापोली – ८.५४ %
२) गुहागर – ९.१६%
३) चिपळूण- १०.१४%
४) रत्नागिरी – ९.७%
५) राजापूर- ८.८९%
वेळ सकाळी ७ ते ११
जिल्ह्याची टक्केवारी – २०.५२%
१) दापोली – १८.३२ %
२) गुहागर – १७.०५%
३) चिपळूण- २४.५७%
४) रत्नागिरी – १८.६०%
५) राजापूर- २४.०७%
सकाळी ७ ते दुपारी १
जिल्ह्याची टक्केवारी – ३८.५२%
१) दापोली – ३७.०१%
२) गुहागर – ४०.४५%
३) चिपळूण- ४०.७७%
४) रत्नागिरी – ३४.२%
५) राजापूर- ४०.९८%
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:54 20-11-2024