रत्नागिरी : दिवाळी आटोपली की सर्वांनाच वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. तुळशीमाईच्या डोक्यावर अक्षता पडल्या की लग्नसराईला प्रारंभ होतो, अशी पद्धत आहे. तुळशीचा विवाह झाला असून, आता उपवर युवक, युवतींना वेध लागलेत ते आपल्या विवाहाचे. विशेष म्हणजे यंदाच्या मोसमात मार्चअखेर ४१ विवाह मुहूर्त असल्याने अनेक इच्छुकांच्या डोक्याला मुंडावळ्या आणि बाशिंग बांधले जाणार हे नक्की.
हल्लीच्या जमान्यात विवाह जुळविणे आणि तो सुरळीत पार पाडणे मोठे जिकीरीचे झाले आहे. आधीच लग्न जमविताना येणाऱ्या अडचणींनी वधूपित्यापेक्षा वरपिताच हैराण झाले आहेत. अनेक विवाहस्थळांकडून प्रतिसादच मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी या पित्यांच्या आहेत. त्यामुळे मुला, मुलींची लग्न जमविणे मोठे आव्हानच होऊन बसलेले आहे.
मुलीकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या अवास्तव अपेक्षा, त्यात विशेष करून पहिलाच प्रश्न असतो तो म्हणजे मुलाच्या पॅकेजचा. या एकाच मुद्यावर आजच्या घडीला हजारो मुले, मुली सगळी चांगली स्थिती असूनही विवाह बंधनात अडकलेली नाहीत, असे विदारक चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यातूनही लग्न जुळले तर विवाह मुहूर्त, मंगल कार्यालये आणि तत्सम गोष्टी यांचाही विचार करावा लागतो. विवाह सोहळ्यासाठी मंगल कार्यालये, सार्वजनिक हॉल, बैंक्वेट हॉल आदींचे बुकींगही हाऊसफुल्ल होऊ लागलेले आहे. आचारी, कॅटरिंग आदींनाही वाढती मागणी आहे.
पाच महिन्यांत विवाहाचे ४१ मुहूर्त
तुळशी विवाह झाल्यावर बोहल्यावर चढणाऱ्यांना स्वतःच्या विवाहाचे वेध लागतात. यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी नोव्हेंबर, डिसेंबर ते मार्च २०२५ पर्यंत ४१ मुहर्त आहेत. विवाह मुहूर्ताच्या सर्वाधिक तारखा डिसेंबरमध्ये आहेत, यावर्षी तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल द्वादशी बुधवार, दि. १३ नोव्हेंबर ते कार्तिक पौर्णिमा शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबरपर्यंतची तिथी आहे. त्यानंतर विवाह करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. विवाह मुह्ताँच्या तारखा नोव्हेंबर २०२४: २२, २३, २५, २६, २७, डिसेंबर ३, ५, ६, ७, ११, १२, १४, १५, २०, २३, २४, २६. जानेवारी २०२५: १६, १७, १९, २१, २२, २६. फेब्रुवारी ३, ४, ७, १३, १६. १७, २०, २१, २२, २३, २५ मार्च १, २, ३, ६, ७, १२, १५.
सोने दरात तेजी
लग्नसराईच्या निमित्ताने सध्या सोने बाजारातही कमालीची तेजी आली आहे. नवीन दागदागिने तयार करण्यासाठी वधू वर पक्षांच्या मंडळींची गर्दी बाजारात दिसत आहे. यामुळे दरातही चढ उतार होताना दिसत आहेत. सध्या निवडणुकीचे बातावरण असल्याने हे दर कमी होत असल्याचा अंदाज व्यापारीवर्गातून व्यक्त केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 20/Nov/2024