चिपळूण : मौजे शृंगारपूर येथील महाराणी येसूबाई यांच्या स्फूर्तिस्थळासाठी साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष कोकणचे सुपुत्र सुहास राजेशिर्के यांचा अखंड पाठपुरावा सुरू आहे. कोकण विभागीय आयुक्तांमार्फत हा प्रस्ताव राज्याचे महसूल व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंत पोहोचला आहे. तसेच या स्फूर्तिस्थळासाठी निधी उपलब्ध व्हावा, याकरिता सुहास राजेशिर्के यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिपळूण येथे जनसंवाद यात्रेदरम्यान भेट घेतली आणि या मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.
यावेळी चिपळूणचे आमदार शेखर निकम, शृंगारपूरचे सरपंच विनोद पवार व अभिषेक ढसाळ आदी उपस्थित होते. राजेशिर्के यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. प्रशासनाने त्यांच्या मागणीची दखल घेऊन हा प्रस्ताव कोकण विभाग आयुक्तांकडे पाठवला आहे. तेथून तो प्रस्ताव राज्याचे महसूल व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पोहोचला आहे.
मौजे शृंगारपूर येथील सर्वे नंबर १४२ येथील जागा ग्रामपंचायत मालकीची असून, येथे सात-बारा दप्तरी सरकारी गोठण अशी नोंद आहे. या जागेपैकी ४० बाय ३० इतकी जागा स्वराज्याच्या कुल मुखत्यार महाराणी येसूबाई यांच्या स्मारकासाठी आवश्यक आहे. स्मारकानंतरही या जागेची मालकी शृंगारपूर ग्रामपंचायतीकडे राहणार आहे. सध्या या ठिकाणी एक चौथरा बांधण्यात आला असून, त्याला महाराणी येसूबाई संभाजीराजे भोसले असे नाव देण्यात आले आहे.
हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होण्यासाठी वाव आहे. त्याकरिता शृंगारपूर येथील नियोजित स्थळी मोठे स्फूर्तिस्थळ होणे आवश्यक असल्याची येथील ग्रामस्थांची भावना आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:11 PM 25/Sep/2024