चिपळूण : खेर्डी एमाडीसी रस्त्यावर कचऱ्याचं साम्राज्य

चिपळूण : खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाच्या लगत असणारा रस्ता चक्क ‘कचरा डेपो’च बनला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस प्लास्टिक पिशव्यांचा अक्षरशः खच पडला आहे. या कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली असून, अतिशय गलिच्छ चित्र निदर्शनास पडत आहे. नागरिक व कामगार वर्गाला त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

खेर्डी औद्योगिक वसाहत ही जिल्ह्यातील सर्वांत जुनी आहे. या परिसरात खेर्डीसह आजूबाजूच्या गावांतील नागरिक सकाळ, संध्याकाळ वॉकिंगसाठी येतात. येथे कंपन्या, कारखाने असल्याने कामगार वर्गाची रेलचेल असते. त्यामुळे येथील रस्त्यांवर कायम वर्दळ असते. या परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यालय आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या कार्यालयालगत असणाऱ्या रस्त्याला सध्या कचऱ्याने विळखा घातला आहे. बेधडकपणे येथे कचरा फेकला जात आहे. या कचऱ्यामुळे या परिसरात येथे भटकी कुत्री व मोकाट गुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेकवेळा ही भटकी कुत्री अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत आहेत. नागरिकही येथून चालताना दुर्गंधीमुळे नाक मुरडत जातात. या गंभीर समस्येकडे सामाजिक कार्यकर्ते अशोक पवार यांनी लक्ष वेधले होते; मात्र आजही जैसे थे परिस्थिती आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन तेथील कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 20/Nov/2024