मंडणगड तालुक्यात मतदान शांततेत

मंडणगड : विधानसभा सार्वत्रिक निवडणूककरिता २० नोव्हेंबर रोजी तालुक्यात राबवण्यात आलेली मतदान प्रक्रिया शांततेत झाली. तालुक्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

मतदानाकरिता निवडणूक आयोगाने मंडणगड तालुक्यात ७४ मतदान केंद्रे सज्ज केली होती. तालुक्यात ५७ हजार ४७७ मतदार मतदानास पात्र होते. यात २९ हजार ९१२ महिला मतदार व २७ हजार ५६६ पुरुष मतदारांचा समावेश आहे. तालुक्यात सकाळच्या दोन तासांच्या सत्रात मतदात्यांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. दुपारी ऊन वाढल्यावर मतदानाचा उत्साह ओसरताना दिसून आला, सायंकाळी ५.०० वाजेपर्यत तालुक्यातील ५९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

तालुक्यात १४ दिव्यांग व ८५ वर्षांचेवरील २२६ ज्येष्ठ नागरिक असे एकूण २४० होम व्होटर आहेत. यात २१० ज्येष्ठ नागरिक मतदार व १४ दिव्यांग असे २२४ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावित होम व्होटींग केले आहे. बहुरंगी लढतीमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुंबई व पुणे स्थित मतदार येण्याची शक्यता होती, अपेक्षनुसार चाकरमानी मतदार मोठ्या संख्येने दाखल झाले.

तालुक्यात मतदारांमध्ये उत्साह
प्रशासनाने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगानी मतदान करावे या करिता प्राधान्याने सुविधा देत मतदान करण्यासाठी सहकार्य केल्याने या वर्गातील मतदात्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. तालुक्यात नव्वदी पार केलेल्या अनेकांनी मतदानाचा अधिकार बजाविला. सुशिक्षित मतदारांनी मतदानानंतर समाज माध्यमांमध्ये आपले फोटो शेयर करीत इतर नागरिकांना मतदानाची कर्तव्यपूर्ती करण्याचा संदेश दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 21/Nov/2024