गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे बुधवारी विधानसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची संख्या रोडावल्याचे चित्र दिसून आले. विधानसभा निवडणुकीची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आल्यामुळे मतदानासाठी मतदार घरातच थांबले होते. यामुळे गणपतीपुळेसह जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांवर शुकशुकाट होता.
दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या शाळा, दि. २० रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान व दि. २३ रोजी निकालाची प्रक्रिया होणार असल्याने या आठवड्यात पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यातच पर्यटकांना आता ‘थर्टी फर्स्ट’चे वेध लागल्याने यापुढील काही दिवस कोकणात पर्यटकांची संख्या कमी होणार आहे. नववर्षाच्या स्वागताला मात्र पर्यटकांनी जिल्हा गजबजून जाईल, असे व्यावसायिकांतून सांगण्यात येत आहे.
येथील स्थानिक दुकानदारांनी बुधवारी सकाळीच मतदान करून आपली दुकाने उघडली; मात्र या दिवशी पर्यटकदेखील मतदानासाठी घरीच थांबल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर जाणवला. जिल्ह्यात सध्या थंडीची चाहूल लागत असून, रात्रभर गारवा जाणवत आहे. आता हिवाळी पर्यटन सुरू होणार असून, त्याअनुषंगाने व्यावसायिक तयारी करत आहेत.
समुद्रकिनारेही ओस
गणपतीपुळेसारख्या गजबजलेल्या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी बुधवारी अत्यंत कमी प्रमाणात पर्यटक व व भाविक आले. गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी अत्यंत तुरळक प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून आली, तर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची संख्या पूर्णतः कमी झाल्याने शुकशुकाट पसरला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 21/Nov/2024