अदानींना अटक करा : राहुल गांधी

नवी दिल्ली : अमेरिकेच्या सिक्योरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (SEC) अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक करणे तसेच सरकारी अधिकाऱ्यांना लाच देणे, असे आरोप गौतम अदानींवर करण्यात आले आहेत.

याप्रकरणी अदानी यांचे भाचे सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी तसेच एज्योर पॉवर ग्लोबल लिमिटेडच्या अधिकाऱ्यांवरही आरोप लावण्यात आले आहेत. यावरुन आता अदानी समूह हा अडचणीत आला आहे. त्यातच आता या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठी मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी अदानींसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.

“भाजप सरकार अदानींना वाचवेल”

“गौतम अदानी फसवणूक प्रकरणावर आम्ही गप्प बसणार नाही. हा मुद्दा आम्ही संसदेतही मांडणार आहोत. भाजप सरकार अदानींना वाचवेल, हेही आम्हाला माहिती आहे. अदानी यांनी २ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, तरीही त्यांना अटक केली जात नाही, असे अमेरिकन तपास संस्थेने म्हटले आहे. अदानी आताही तुरुंगाबाहेर का आहेत? त्यांना तात्काळ अटक करावी. त्यांच्यावरील आरोपांची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी”, असे राहुल गांधी म्हणाले.

“अदानी जेलमध्ये गेले तर पंतप्रधान मोदीही जातील”

“जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतमी अदानी एकत्र आहे, तोपर्यंत ते सुरक्षित आहेत. आम्हाला माहिती आहे की सरकार अदानींवर कोणतीही कारवाई करणार नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानींच्या पाठिशी आहेत. ते त्यांचे पूर्णपणे संरक्षण करत आहेत. अदानी जेलमध्ये गेले तर पंतप्रधान मोदीही जातील. भाजपचा निधी अदानीशी जोडलेला आहे”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

“अदानी भारतात रोज भ्रष्टाचार करतात”

“गौतम अदानींवर जे घोटाळ्याचे आरोप झाले आहेत, ते मी केलेले नाहीत. अदानींची चौकशी झाली पाहिजे. अदानी भारतात रोज भ्रष्टाचार करत आहेत. संपूर्ण देश अदानींच्या ताब्यात आहे”, असाही घणाघात राहुल गांधींनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 21-11-2024