संगमेश्वर : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटरमध्ये गेली अनेक वर्षे महत्त्वाची वैद्यकीय अधिकऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपचार करण्यात अडथळे येत असून त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी आरोग्य यंत्रणा मजबूत असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने लोकप्रतिनिधींनी पावले उपलली पाहिजेत, तरच त्याचा उपयोग सर्वसामान्यांना होऊ शकतो.
मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर- कसबा नजीक ग्रामीण रुग्णालय आणि त्याच इमारतीसमोर ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. संगमेश्वर परिसरातील सुमारे ९५ गावातील सर्वसामान्य ग्रामस्थांना या संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचा महत्त्वाचा आधार आहे. तर आरवली ते बावनदी या ४० किलोमीटरच्या अपघातप्रवण क्षेत्रात अपघातग्रस्तांवर तातडीचे उपचार व्हावेत, याकरिता या अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे.
मात्र, गेली अनेक वर्षे या ट्रामा केअर सेंटरमधील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयासह महत्त्वाच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये अत्यावश्यक असलेली डॉक्टरांचीच अनेक पदे रिक्त असल्याने अन्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी या महत्त्वाच्या पदांसह तब्बल १२ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांअभावी रुग्णसेवाच ‘आजारी’ पडली आहे. महत्त्वाच्या वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी तसेच तांत्रिक पदे रिक्त असल्यामुळे येथील सोनोग्राफी मशिनरी पडून आहे. ग्रामीण रुग्णालय ग्रामस्थांसाठी आधार ठरत असूनही, अस्थाई स्वरूपाच्या पदांव्यतिरिक्त कायमस्वरूपी डॉक्टरांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यरत डॉक्टरांना अतिरिक्त भार सोसावा लागत आहे. अत्यावश्यक सेवा देताना अनेक अडथळे येतात. ग्रामीण रुग्णालयाची ही अवस्था असतानाच लाखो रुपये खर्चुन उभारलेल्या ट्रामा केअर सेंटरचीही तीच परिस्थिती आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:08 PM 21/Nov/2024