रत्नागिरी : राज्यातील वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच रस्त्यावरील प्रवासी वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यासाठी मोटार वाहन नोंदणी नियम २०२१ ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याबाबत नुकताच गृह विभागाने आदेश काढला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांत कार्यवाही होणार आहे. त्यामुळे जुनी व कालबाह्य वाहने दि. ३१ जानेवारी २०२५ पर्यंत स्क्रॅप होणार आहेत.
वाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारणे, वाहनांवरील देखभाल खर्च कमी करणे तसेच जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणणे व त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक सुधारणा होण्यासाठी केंद्र शासनाने मोटार वाहन नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करण्यात आली आहेत. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व सार्वजनिक परिवहन उपक्रम यांच्या कार्यालयांतील नोंदणी दिनांकापासून १५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारी राज्य शासनाच्या मालकीची वाहने स्क्रॅप करणे आवश्यक आहे.
जी शासकीय वाहने १५ वर्षापेक्षा जास्त वयाची आहेत व ज्यांचे निर्लेखन करण्यात आले नाही, परंतु ती आजअखेर वापरात आहेत, अशी वाहने स्क्रॅप केल्यानंतर त्या वाहनांच्या बदल्यात संबंधित विभागास नवीन वाहन खरेदी, भाडेतत्त्वावर घेता येणार आहेत. आदेशाची अमंलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही परिवहन आयुक्त कार्यालयाने करावी, असेही आदेशात म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व सार्वजनिक परिवहन उपक्रम यांच्या कार्यालयातील १५ वर्षापेक्षा जास्त वयाची वाहने स्क्रॅप होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:02 PM 22/Nov/2024














