गुहागर मतदासंघात वाढीव मतदानाचा टक्का निणर्याक

गुहागर : अनेक निवडणुकांचा अनुभव गाठीशी असलेले आमदार भास्कर जाधव विरुध्द विधानसभा प्रथमच लढणारे राजेश बेंडल यांच्यात सामना होत आहे. प्रचारात आमदार जाधव यांची मुख्य मदार ठाकरे शिवसेनेवर होती, तर राजेश बेंडल यांच्या प्रचारात महायुतीबरोबर कुणबी समाजोन्नती संघ, बळीराज सेना अशा संस्थाही उतरल्या होत्या.

सुरुवातीला आमदार जाधव यांच्या बाजूला असलेले वातावरण अखेरच्या टप्प्यात राजेश बैंडल यांना बळकट करून गेले. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित आहे. अवघ्या हजारांच्या फरकाने दोघांपैकी एकाचा विजय होईल असा अंदाज आहे.

गुहागर विधानसभेची जागा महाविकास आघाडीतर्फे आमदार जाधव किंवा आमदारपुत्र विक्रांत जाधव हेच लढणार हे निश्चित होते. याउलट महायुतीचा उमेदवार निवडणुका जाहीर झाल्या तरी ठरत नव्हता. अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीतून प्रवेश केलेले राजेश बेंडल यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. शिवसेनेने विधानपरिषदेचे आमदार रवींद्र पाठक आणि ठाण्यातील नगरसेवक राजेश मोरे या दोघांना निवडणुकीच्या व्यवस्थापनासाठी पाठवले. भाजपनेही मोठ्या भावाची जबाबदारी सांभाळत प्रचाराचे शिवधनुष्य उचलले. प्रदीप बेंडल यांनी कुणबी समाजोन्नती संघ आणि बळीराज सेनेच्या प्रचारातील समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली.

निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने राज्य व केंद्र सरकारने केलेले काम, लाडकी बहीण योजना, कुणबी समाजाचे एकगड्डा मतदान, सर्वसमावेशक विकास, गुहागरमधील हॉस्पिटल या मुद्द्यांवर जोर दिला. मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेसाठी ताकद लावली. तर महाविकास आघाडीकडून आमदार जाधव यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांकडे पाहून मतदान करा, असे आवाहन केले.

आमदार जाधव यांनी ही जिल्हा परिषद गटनिहाय प्रचारसभा आणि कार्यालयातून दररोज संपर्क यावर भर दिला होता. कळंबट गावातील विषय वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी उचलून धरला. त्यावेळी त्यांनी थेट आमदार जाधव यांच्यावर टिका केली होती. मतदानाच्या चार दिवस आधी त्यांच्यावर नरवणला प्राणघातक हल्ला झाला. त्यावेळीही त्यांनी आमदार जाधव यांच्याच नावाचा उल्लेख केला. हा मुद्दा महायुतीने प्रचारात आणला नाही. हे सर्व मुद्दे निवडणुकीत परिणामकारक ठरतील. गुहागर विधानसभा मतदारसंघात २०१९ विधानसभा (५९.४५) आणि २०२४ लोकसभेपेक्षा (५६.४३) अधिक मतदान (६१.७९) झाले आहे. हे वाढीव मतदानही निवडणुकीचा निकाल ठरवणारेच ठरेल.

मनसे’ने ताकद वाढवली
मनसेने देखील वर्षभरापासून निवडणुकीची तयारी केली. तालुका संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांनी आधीपासूनच विधानसभेत प्रचार सुरू केला होता. यावेळी प्रचाराचे वेगवेगळे फंडेही मनसेने वापरले. मात्र, शेवटच्या घटकेला प्रत्यक्ष मतपेटीत त्याचा परिणाम दिसून येण्यासाठी आवश्यक कार्यकर्त्यांचे बळ त्यांच्याकडे नव्हते. मात्र, आधीच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या तुलनेत मनसेने आपली ताकद वाढवली हे निश्चित आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 22/Nov/2024