रत्नागिरी : बाजारात लसूण, कांद्याचे दर अजूनही वधारलेलेच!

रत्नागिरी : बाजारात लसणीचे दर अद्यापही वाढलेलेच असल्यामुळे लसूण महागच आहे. सध्या टोमॅटोचे दर उतरलेले असले तरीही काही भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. तर कांद्याच्या दराने गृहिणींच्या डोळ्यात अजूनही पाणीच आणले आहे. जुना कांदा ६५ ते ७० तर नवीन कांदा ५० रुपये किलो आहे. बटाटा विक्री ४० रुपये किलो दराने सुरू आहे.

दिवाळीच्या तोंडावर पडलेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाज्यांची आवक मंदावली असून, दरात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. जुन्या कांद्याचा साठा संपत आल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. नवीन कांदा बाजारात येऊ लागला आहे; परंतु दर वाढलेलेच आहेत. लसणाचे दर गेले सहा महिने स्थिर आहेत. ४०० रुपये किलो दराने विक्री सुरू असल्याने फोडणीही महागली आहे. गवार, घेवडा, फरसबी, शेवग्याने शंभरी पार केली असून, भाज्यांची खरेदी परवडेनाशी झाली आहे. लिंबांची आवक वाढली असून, हिवाळा सुरू झाल्याने दरात काही प्रमाणात घट झाली आहे. शंभर रुपये किलो दराने लिंबू विक्री सुरू आहे. किरकोळ विक्री १० रुपयांना दोन किंवा तीन नग याप्रमाणे सुरू आहे. लिंबाच्या आकाराप्रमाणे नगावर विक्री सुरू आहे. गेले कित्येक महिने ५० रुपये पाव किलो दराने आले विक्री सुरू होती. मात्र, सध्या आल्याच्या दरात घट झाली असून, ३० रुपये पाव किलो प्रमाणे विक्री सुरू आहे. हिवाळ्यात आल्यासाठी वाढती मागणी आहे. गावठी किंवा स्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पालेभाज्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. मुळा, माठ, पालक, चवळी, मेथी, मोहरीच्या भाज्यांचा समावेश आहे. २५ ते ३० रुपये जुडीप्रमाणे विक्री सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:03 PM 22/Nov/2024