रत्नागिरी : सध्या आपल्या दुचाकी, चारचाकी वाहनांना अनेक वाहनमालक चॉईस क्रमांक घेतात. त्यासाठी अर्ज करावा लागतो. आता तुमच्या वाहनाला पसंतीचा क्रमांक हवा असेल, तर आरटीओ कार्यालयात जाण्याचे हेलपाटे संपणार आहेत. लवकरच हे नंबर घरबसल्या ऑनलाईन मिळणार आहेत. सध्या याचे सॉफ्टवेअर बनविण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर ही सेवा कार्यरत होणार असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आली.
दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहने यांचे काही हौशी मालक आपल्या वाहनांना पसंतीचे वाहन क्रमांक मिळवण्यासाठी धावपळ करतात, काहीजणांना ठराविकच नंबर हवा असतो हाच नंबर माझ्या वाहनासाठी लकी आहे अशी त्यांची विचारसरणी असते. तर काही वाहनचालकांची फॅन्सी नंबर आपल्या वाहनाला मिळण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी असते.
त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनेक फेया वाहनचालक (आरटीओ) चकरा मारताना दिसून येतात. यातून लाखो रुपयांची फसवणूकही होत असते. ऑनलाईन सेवेमुळे याला आळा बसण्यास मदत होणार आहे.
वरिष्ठ स्तरावर सॉफ्टवेअर बनविण्याचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली. परवाना मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे, चालान भरणे यासह विविध सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
वाहनधारकांची सोय होणार
सणासुदीला व इतर वेळेत वाहन खरेदी केल्यावर पसंतीचा हवा असलेला वाहन क्रमांक देण्यासाठी अनेकांचा हट्ट असतो. आता वाहनमालकांना घरबसल्या पसंतीचा क्रमांक मिळवता येईल. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्यापासून सुटका मिळणार आहे.
या सुविधा मिळतील ऑनलाईन
राज्यातील वाहनधारकांच्या सुविधेसाठी आरटीओतील लर्निंग लायसन्स, लायसन्सवरील पत्ता बदलणे, जन्मतारीख बदलणे, लायसन्स हरवल्यास दुय्यम प्रत काढणे, वाहन हस्तांतरित करणे, गहाळ ‘आरसी’ची दुय्यम प्रत काढणे यासह ५० हून अधिक सेवा वाहनचालकांना ऑनलाईन उपलब्ध राहणार आहेत. आता वाहनांचा पसंती क्रमांकही ऑनलाईन मिळवता येणार आहे. परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत यासाठी सॉफ्टवेअर तयार केले जात आहे. त्याच्या यशस्वी चाचणीनंतरच सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:25 PM 22/Nov/2024