पाचल : वैष्णवी माने मृत्यू प्रकरण- मुख्याध्यापकांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश

राजापूर : शाळेत गरबा नृत्य खेळत असताना चक्कर येवून पडल्याने वैष्णवी प्रकाश माने या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद असलेले पाचल येथील सरस्वती विद्यामंदिरचे मुख्याध्यापक तानाजी विठोबा देसाई यांना तत्काळ निलंबित करून पदमुक्त करण्यांचे आदेश कोल्हापूर विभागाचे शिक्षण. उपसंचालक यांनी पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाला दिले आहेत.

राजापूर तालुक्यातील पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे १० ऑक्टोबर २०२४ रोजी गरबा नृत्य कार्यक्रमावेळी या कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वीत शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी वैष्णवी प्रकाश माने हिला चक्कर आल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी वैष्णवी हीचे वडील प्रकाश लक्ष्मण माने यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे वैष्णवीच्या मृत्यूला शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापक जबाबदार असून त्यांच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तसेच मुख्याध्यापक देसाईंवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार देसाई यांच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही त्यांना निलंबित करण्यात आले नव्हते.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश ज. चोथे यांनी मुख्याध्यापक देसाई यांना तत्काळ निलंबित करून पदमुक्त करण्याचे आदेश पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाला दिले आहेत. जिल्हा परिषद शिक्षणाधिक ाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुस पार, घटना ही घडल्यानंतर त्याचदिवशी तत्काळ मुख्याध्यापक यांनी राजापूर पंचायत संमितीचे गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, रत्नागिरी यांना कळविणे गरजेचे असताना ही बाब गांभीर्याने न घेता १० ऑक्टोबर २०२४ रोजीची घटना ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी कळविली. ही शालेय प्रशासन व विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब असल्याचे उपसंचालकांनी या आदेशात नमूद केले आहे.

मुख्याध्यापक देसाई यांनी महाराष्ट्र कर्मचारी खासगी शाळांतील (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम क्र.२८ (५) (क) (एक) चा भंग केला आहे. महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ नुसार संस्था नियुक्त कर्मचाऱ्यांवर कारवाईबाबतचे अधिकार हे संबंधित संस्थेचे असल्याने या प्रकरणी तत्काळ कारवाई करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाला दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:14 22-11-2024