लांजा : साटवली गावात माकडे पकडण्याची मोहीम

लांजा : लांजा वनविभागाचे वनपाल सारीक फकीर यांचे मार्गदर्शनाखाली गुरुवारी २१ नोव्हेंबर रोजी साटवली बाजारपेठ व गांगोवाडी येथे माकडे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली. यावेळी १३ माकडे व ५ वानर पकडण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून साटवली परिसरात माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला होता. लोकांच्या घरांदारांच्या नुकसानी बरोबरच भाजीपाला शेती आणि बागायती यांची देखील मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात होती. त्यामुळे वनविभागाने या ठिकाणी माकड पकडण्याची मोहीम राबवण्यात यावी अशी आग्रही मागणी केली जात होती. यापूर्वी २० माकडे पकडण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळपासूनच साटवली बाजारपेठ व गांगोवाडी परिसरात वनविभागा मार्फत माकडे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली. वन्यजीव प्राणी मित्र संदीप गिरी (राहणार सिल्लोड, दत्ता सांगळे, वनरक्षक श्रावणी पवार यांनी अतिशय कुशलतेने माकडांना जेरबंद केले. यावेळी १३ माकडे व ५ वानर पकडण्यात आले.

ही संपूर्ण मोहीम लांजा वनपाल सारीक फकीर यांनी यशस्वीपणे पार पाडली. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण, माजी सरपंच सचिन तरळ, सिताराम कांबळे, संतोष पड्यार, काशिनाथ बापेरकर, सदानंद तरळ, अविनाश पावसकर आदी उपस्थित होते. उपद्रवी माकडांना जेरबंद केल्याने साठवली ग्रामस्थ, शेतकरी यांनी वनविभागाचे आभार मानले. दरम्यान, पकडण्यात आलेल्या माकडांना दूर अभयारण्यात सोडावे, जेणेकरून ती पुन्हा परतणार नाहीत, अशी मागणी साटवली ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 22/Nov/2024