सिंधुदुर्ग : मालवण कुंभारमाठ येथील प्रतिथयश आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांनी दीपावली पाडव्याचा मुहूर्त साधत दि. २ नोव्हेंबर रोजी या वर्षातील पहिली हापूस आंब्याची पेटी नाशिक येथे थेट ग्राहकांपर्यंत पाठविण्याचा मान पटकावला. त्यांची ही आंबा पेटी भारतातच नव्हे तर यंदाची जगातील पहिली आंबा पेटी म्हणून लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये गणली गेली आहे. यामुळे यशस्वी आंबा व्यावसायिक असणाऱ्या डॉ. उत्तम फोंडेकर यांच्या या कामगिरीची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ. उत्तम फोंडेकर यांनी २ नोव्हेंबर रोजी मार्केट मध्ये पाठविलेली हापूस आंब्याची पेटी जगातील पहिल्या मानांकानाची पेटी म्हणून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला गणली गेल्याने जगात जपानच्या मियाँझकीच्या आंब्याचे असलेले प्राबल्य कमी होऊन हापूसचे प्राबल्य प्रस्थापित झाले आहे, असे कौतुकोद्गार जिल्हा कृषी अधीक्षक बी. बी. नाईकनवरे यांनी काढले आहेत. लंडन वरून पाठविलेले वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट आणि मेडल नोडल ऑफिसर लक्ष्मण कुरकुटे आणि इतर कृषी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. फोंडेकर यांना प्रदान करण्यात आले. या वर्ल्ड रेकॉर्डमुळे सिंधुदुर्ग व मालवणचे नाव पर्यटनबरोबर हापूस क्षेत्रातही जगात झळकले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 22/Nov/2024