खेड : भरणे उड्डाण पुलाखालील मोकळी जागा बनलीय ‘वाहनतळ’

खेड : सतत वाहनांच्या रेलचेलीसह पादचाऱ्यांच्या वर्दळीने गजबजलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील भरणे येथील उड्डाण पुलाखालील मोकळी जागा वाहनतळ बनली आहे. या मोकळ्या जागेत कुठेही अनू कशाही पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या मार्गात स्पीडब्रेकर’ निर्माण झाला आहे. सातत्याने वाहतूक कोंडी देखील होत आहे. याशिवाय अपघातांचा धोकाही कायम आहे.

भरणेतील मध्यवर्ती ठिकाण ऐनकेन कारणानी समस्येच्या गर्तेतच अडकले आहे. भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी चारही बाजूने वाहनांची सतत रहदारी सुरू असते. पादचाऱ्यांचीही तितकीच वर्दळ सुरू असते. भरणे येथील उड्डाण पुलामुळे दोन्ही बाजूकडील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भरणे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत कशाही पद्धतीने उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवाराच उडाला आहे. वाहतूक व्यवस्थेत सुरळीतपणा आला असला तरी उड्डाण पुलाखालील भाग नानाविध समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. या ठिकाणच्या मोकळ्या जागेत कशाही पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोडीचा प्रश्न गतवर्षी गणेशोत्सवात पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अतिक्रमणे हटवण्याची मोहीम हाती घेतली होती. उड्डाण पुलाखालील अतिक्रमणांसह रस्त्यालगतची अतिक्रमणे हटवून वाहतूक व्यवस्थेत सुरळीतपणा आणला होता. रिक्षा व्यावसायिकांसाठी देखील दोन्ही बाजूला जागेची निश्चिती करण्यात आली होती. यामुळे वाहतूक व्यवस्थेत सुरळीतपणा आला होता. मात्र सद्यस्थितीत उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागेत कुठेही वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. उड्डाण पुलाखालील मोकळी जागा वाहनतळच बनले आहे. चारचाकी वाहनांसह अवजड वाहने देखील सर्रासपणे उभी केली जात असल्याने वाहनचालकांसह पादचायांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. याठिकाणी उभ्या केल्या जाणान्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोकाही वाढला आहे. याचठिकाणी रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा देखील ठिय्या असतो. यामुळे याठिकाणी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हा परिसर भरणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. ग्रामपंचायतीकडून याप्रश्नी कुठल्याच ठोस कारवाईचा अवलंब केला जात नसल्याने येथे वाहने उभी करणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्यालाही काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला असतानाही याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 22/Nov/2024