रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर घसरला! ‘या’ गोष्टी महागणार

गेल्या काही दिवसांत रुपयाची कामगिरी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर डॉलर आणखी मजबूत झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे.

चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमजोरीमुळे पहिल्यांदाच रुपया 84.50 रुपयांच्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटी आणि बाँड मार्केटमध्ये केलेली विक्री यामुळे रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेला आहे.

जागतिक तणावामुळे डॉलर मजबूत
शुक्रवारी (२२ नोव्हेंबर २०२४) चलन बाजारात एका डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ८४.५०२५ रुपयांच्या पातळीवर घसरले आहे. नोव्हेंबर महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटी आणि बाँड मार्केटमधून ४ अब्ज डॉलरची गुंतवणूक काढून घेतली आहे. इस्रायल-इराण आणि रशिया-युक्रेन तणावामुळे डॉलर मजबूत होत आहे. याउलट भारतीय चलन रुपयासह जगभरातील चलने कमकुवत होत आहेत.

अमेरिकन डॉलरचा निर्देशांक वाढला
सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरच्या कामगिरीचा मागोवा घेणारा यूएस डॉलर निर्देशांक या महिन्यात ३ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प पुढच्या वर्षी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या धोरणांमुळे महागाई वाढू शकते, असे मानले जात आहे. अमेरिकन फेडरल बँक व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी होत आहे. यामुळेही डॉलर मजबूत होत असून रुपया कमजोर होत आहे.

भारतात महागाई वाढणार
डॉलरच्या मजबूतीमुळे आणि रुपया कमजोर झाल्यामुळे भारतात महागाई वाढण्याचा धोका आहे. विशेषत: भारत आयात करत असलेल्या वस्तूंसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७५ डॉलरच्या खाली गेली आहे. मात्र, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांना डॉलरमध्ये पैसे देऊन कच्चे तेल आयात करण्यासाठी अधिक रुपये खर्च करावे लागतील. भारत मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आणि डाळी आयात करतो. त्यामुळे भविष्यात याच्या किमती आणखी भडकू शकतात. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि ऑटोमोबाईल पोर्टची आयातही महाग होणार आहे. याशिवाय आता परदेशी शिक्षणासाठी अधिकचे पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे महागाईचा बोजा वाढेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:16 22-11-2024