रत्नागिरी : राज्याच्या जलधीक्षेत्रातील मिरकरवाडा समुद्रात अनधिकृतपणे आलेल्या कर्नाटकची मच्छीमार नौका सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ताब्यात घेतली आहे. अल बहर असे या नौकेचे नाव आहे. या नौकेत संशयास्पद अशी कोणतीच वस्तू नाही. नौकेत काहीतरी बिघाड झाल्याने ती दुरुस्त करण्यासाठी मिरकरवाडा बंदरात आणली जात असल्याचे मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
कोणत्याही मच्छीमार नौकेला आपले राज्य किंवा बंदर सोडून दुसऱ्या राज्यातील समुद्र क्षेत्रात जायचे असेल तर त्याचा तात्पुरता परवाना घ्यावा लागतो. शुक्रवारी संध्याकाळी कर्नाटकची अल बहर नौका मिरकरवाडा समुद्रात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव आणि त्यांच्या परवाना अधिकाऱ्यांनी बंदरात धाव घेतली. राज्याचे जलक्षेत्र ओलांडले गेल्याने ती नौका अटकावून ठेवण्यात आली असून सागरी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. या नौकेत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा इतर साहित्य मिळून आले नाही. मात्र त्या नौकेच्या स्थलांतराचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याने ती ताब्यात घेण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:26 AM 23/Nov/2024













