दापोली @ १०.९ अंश !

दापोली : तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून थंडीची चाहूल लागली. गेले दोन दिवस या थंडीचा कडाका वाढला असून यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच दापोलीचा पारा गुरुवारी (ता. २१) रात्री १०.९ अंशांपर्यंत खाली आला आहे. मुरुड किनाऱ्यावर पर्यटकांना डॉल्फिनचे दर्शन झाल्याने मोठ्या संख्येने पर्यटक येतील, असा विश्वास येथील व्यावसायिकांनी वर्तवला आहे. मिनीमहाबळेश्वरमध्ये हुडहुडी भरू लागली असून, नागरिकांच्या अंगावर स्वेटर, शाली दिसू लागल्या आहेत. आंबा बागायतदार या वातावरणातील बदलामुळे सुखावले असून, किनाऱ्यावरील व्यावसायिकांनाही पर्यटन हंगामाचे वेध लागले आहेत.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कृषी विभागातील गिम्हवणे येथील हवामान केंद्रावर वा हंगामातील सर्वांत किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअसची नोंद २१ नोव्हेंबरला झाली आहे. थंडीचा हंगाम खरा ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत असतो; परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत पाऊस कोसळत होता. त्यामुळे सायंकाळी पाऊस आणि दिवसभर कडाक्याचे ऊन होते. त्यामुळे तापमान २५ अंशाच्या वर होते. त्यानंतर पुन्हा तापमान वाढून ऐन नोव्हेंबरच्या सुरुवातीला ऑक्टोबर हीट सुरू झाली होती; परंतु आठवड्यानंतर बऱ्यापैकी किमान तापमान उतरू लागल्याने वातावरणात थंडी सुरू झाली. पावसाळ्यानंतर थंडीचा हंगाम सुरु झाल्यावर या हंगामात पहिल्यांदाच पारा खाली आला. त्यामुळे आंबा काजू बागायतदार सुखावले आहेत.

थंडीचा हंगाम सुरू झाला की, या मिनीमहाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी सुरू होते. दोन दिवसांपूवी समुद्रात गेलेल्या पर्यटकांना डॉल्फिन मासा दिसून आला. थंडीच्या हंगामातच विशेष करून मुरुड, पाळंदे, हर्णे समुद्र किनारी डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटकांची होते. या डॉल्फिन सफारीसाठी परिसरतील हर्णे, मुरुड, पाळंदे याठिकाणी खास फायबरच्या फेरीबोटी तयारच असतात. या परिसरामध्ये आलेला प्रत्येक पर्यटक डॉल्फिन बघितल्याशिवाय जातच नाही अशी खासियत आहे. हा डॉल्फिन मासा समुद्रामध्ये उंच उडी घेऊन पुन्हा पाण्यात जातो हे दृश पाहताना पर्यटकांना वेगळाच आनंद मिळत असतो. तसेच या हंगामात आता लवकर सुमुद्र किनाऱ्यावर सीगल पक्षी देखील दाखल होतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 23/Nov/2024