चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीच्या दिवशी वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चिंचनाका ते बहादूरशेख नाका व बहादूरशेख नाका ते चिंचनाका या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येत आहे, असे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले.
सदर मार्गावरील वाहनांना पर्यायी मार्ग मुंबई व कराड कडुन चिपळूण शहरात येणारी जड वाहने, एस.टी. बससह इतर सर्व वाहने बहादुरशेख नाका मुंबई गोवा हायवे, डीबीजे कॉलेज, शिवाजी नगर बस स्थानक, पॉवर हाऊस सर्कल मार्गे एस.टी. बसस्थानक व चिपळूण शहरामध्ये जाण्याचा मार्ग आहे. चिपळूण शहर व बसस्थानकातून चिपळुण पोलीस ठाणे- पॉवर हाऊस मार्गे मुंबईकडे व
रत्नागिरीकडे जाता येणार आहे.
विधानसभा निवडणुकीची युनायटेड हायस्कूल चिपळूण येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शेखर निकम यांचे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांचे समर्थक, दोन्ही पक्षाचे समर्थक मतमोजणीचे निकाल ऐकण्यासाठी युनायटेड हायस्कूल मार्कडी समोर चिंचनाका ते बहादूरशेख नाका जाणारे रोडवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था व शांतता अबाधीत रहावी याकरिता मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ अन्वये वरील आदेश देण्यात आला. वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११६ प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलिस विभागाने करावयाची आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 23/Nov/2024














