चिपळूण : शहरातून चिपळूण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर गांधारेश्वर पुलावर अखेर पथदीप झळाळले आहेत. या पुलावर पथदीप बसवावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आता पथदीप झळाळल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. वालोपे येथील चिपळूण रेल्वे स्थानकात जाण्यासाठी गांधारेश्वर हा जवळचा मार्ग आहे. या मार्गावरून अनेक जणांची ये-जा सुरू असते. याच मार्गावर वाशिष्ठी नदीवर असलेल्या गांधारेश्वर पुलावर पथदीप नव्हते. त्यामुळे रात्रीच्यावेळी प्रवास करणे कठीण बनले होते. रात्री-अपरात्री मुंबई, गोव्याहून प्रवासी चिपळूण शहरात आल्यानंतर अंधारातून जीव मुठीत धरून त्यांना यावे लागत होते. या पुलावर पथदीप बसवावेत, अशी मागणी मुरादपूर परिसरातील नागरिक, मुरादपूर येथील श्री गांधारेश्वर प्रासादिक संगीत भजन मंडळ, सामाजिक कार्यकर्ते सुनील नानिसकर, विलास पडवेकर, सुरेश कदम, मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष संतोष कदम आदींनी केली होती. यानंतर उपलब्ध निधीतून गांधारेश्वर पूल परिसरात पथदीप बसविण्यात आले आहेत. याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 23/Nov/2024












