रत्नागिरी : शेतकऱ्यांसाठी स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

रत्नागिरी : शेती करताना अपघाती निधन झाल्यास शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी राज्य शासनातर्फे स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. शेतामध्ये काम करत असताना, रेल्वे, रस्ते अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. २००९ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

शेती व्यवसाय हवामानावर अवलंबून असल्याने बेभरवशी मानला जातो. शेतात काम करतानाच नव्हे तर, अनेकदा इतर ठिकाणी अपघात होतात. अपघातानंतर शेतकऱ्यांच्या वारसाला मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. अपघातासह पाण्यात बुडून, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा धक्का, नैसर्गिक आपत्ती अशा संकटात शेतकरी जखमी किंवा मृत्यू झाल्यास मदत दिली जाते. शिवाय शरीराचा एखादा भाग निकामी झाला असला तरीही आर्थिक मदत दिली जाते. मृत्यू झाल्यास दोन लाख तर अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये देण्यात येतात. सातबारा नावावर असलेली व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते. अपघात व त्याच्या परिणामानुसार मदत केली जाते.

शेतकरी कुटुंबीयांनी तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयाकडे याबाबत अर्ज करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्रुटीमुळे प्रस्ताव नामंजूर होऊ शकतात. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास २००९ पासून आर्थिक हातभारासाठी वारसांना सानुग्रह योजना सुरु होती. मात्र २०१५ मध्ये स्व. गोपीनाथ मुंडे ही योजना सुरु करुन शेतकरी कुटुंबांना आर्थिक हातभार दिला जात आहे.

कागदोपत्री पूर्तता झाल्यानंतर सानुग्रह अनुदान
शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू असून, शेतकऱ्यांच्या वारसांनी अपघातानंतर तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधून अर्ज, सोबत कागदोपत्राची पूर्तता करायची आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर वारसांना सानुग्रह अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 23/Nov/2024