रत्नागिरी : खालगावत आजपासून कालभैरव जयंती उत्सवला प्रारंभ

रत्नागिरी : तालुक्यातील खालगाव येथे श्री विश्वेश्वर कालभैरव प्रासादिक मंडळ, मुंबईतर्फे विश्वेश्वर कालभैरव मंदिरात कालभैरव जयंती उत्सव आजपासून (ता. २३) २५ नोव्हेंबरपर्यंत साजरा होणार आहे.

या उत्सवात आज सकाळी ८ वा. लघुरुद्र, ११ वा. अमृत महोत्सव उत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ आंबा बागायतदार प्रभाकर तथा काकासाहेब मुळ्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने होणार आहे. रात्री ८ वा. आरत्या, भोवत्या, ११ वा. हभप सायली मुळ्ये-दामले यांचे कालभैरव प्रगटन यावरील सुश्राव्य कीर्तन होईल. रविवारी (ता. २४) सकाळी अभिषेक, धार्मिक कार्यक्रम होतील. रात्री ८ वा. आरत्या, भोवत्या, १० वा. सायली मुळ्ये यांचे कीर्तन होईल. ११ वा. कोकणचे खेळे खालगावमधली गोताडवाडी सादर करणार आहे.

जयंती उत्सवाच्या शेवटच्या दिवशी २५ ला सकाळी ११ वा. महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रात्री ८ वा. आरत्या, भोवत्या, १० वा. सायली मुळ्ये यांचे सुश्राव्य कीर्तन, ११ वा. वरवडे, खंडाळा येथील कलारंग नाट्य प्रतिष्ठानातर्फे दोनअंकी संगीत होनाजी बाळा हा नाट्यप्रयोग होणार आहे. निर्मिती व दिग्दर्शन अभय मुळ्ये यांचे आहे. अमृत महोत्सवी उत्सव कालावधीत ग्रामस्थ, भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वास खालगावकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 23/Nov/2024