चिपळूण : पेढे येथील हिरकणी महिला प्रभागसंघाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

चिपळूण : आंध्रप्रदेश महिला अभिवृद्धी सोसायटीतर्फे गेल्या तीन वर्षांपासून स्वयंसाहाय्यता समूह फेडरेशनसाठी राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करीत आहे. स्टेट बैंक ऑफ इंडिया, शासकीय संस्था, विविध आर्थिक संस्थांच्या सहकार्यान ही सोसायटी स्वयंसाहाय्यता समूह फेडरेशनसाठी महिला सक्षमीकरणाचे काम करीत आहे. भारतातील २२ राज्यांतून पेढे येथील हिरकणी महिला प्रभागसंघास २०२४ चा राष्ट्रीय स्तरावरील तिसरा राष्ट्रीय समूह फेडरेशन पुरस्कार जाहीर झाला आहे.

गुरुवारी (ता. २२) राष्ट्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग संस्थान युसुफगुडा हैद्राबाद येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. पेढे येथील हिरकणी महिला प्रभागसंघाची स्थापना २७ फेब्रुवारी २०१९ मध्ये झाली. २०१९ मध्ये प्रभागसंघाची स्थापना झाली. आवश्यकतेनुसार त्यांना फिरता निधी, बैंक अर्थसाहाय्य, समुदाय गुंतवणूक निधी मिळाला यातून मूलभूत गरजांची पूर्तता झाल्याने महिलांनी छोटे-मोठे व्यवसाय करायला सुरवात केली. या प्रभागसंघातील ३२० समूहांमधून विविध व्यवसाय करणाऱ्या महिलांचे ३१ उत्पादक गट तयार केले. महिलांनी उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ मिळण्यासाठी कनकहिरकणी महिला शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. यामध्ये ९६५ महिलांना संघटित करण्यात आले. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेती उत्पादने व कुक्कुटपालन, शेळीपालन व मधुमक्षिकापालन या शेतीउपयोगी व्यवसाय वाढविण्यासाठी काम केले. शासनामार्फत या प्रभागात ३१८ समूहांना ९५.४० लाख फिरता निधी, २१९ समूहांना १३१.४० लाख समुदाय गुंतवणूक निधी, प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ असे मिळून ८१५ वेळा १८.९० कोटीचे बैंक अर्थसाहाय्य, तर २१ उत्पादक गटांसाठी ९६ लाखांचा निधी देण्यात आला. प्रभागसंघाला गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांच्यासह पदाधिकारी, मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

चिपळूण तालुक्यातील पेढे येथील हिरकणी महिला प्रभागसंघाला राष्ट्रीय स्तरावरील तिसरा उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला. जिल्ह्यासाठी निश्चितच कौतुकास्पद आहे. यातून जिल्ह्यातील इतर प्रभागसंघांना निश्चितच प्रेरणा मिळेल – कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी

सचोटीने व्यवसाय करण्यासाठी प्रभाग संघातील महिलांनी मोठी मेहनत घेतली आहे. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने प्रभागात आनंदाचे वातावरण आहे. उमेद अभियानामुळे होत असलेल्या प्रगतीचे दर्शन यातून होते. – आशा जाधव, प्रभागसंघ, अध्यक्षा

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 23/Nov/2024