रत्नागिरी : पावस पंचक्रोशीत आंबा, काजू बागेच्या राखणीसाठी गुरखे दाखल

पावस : पावस परिसरामध्ये थंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने आंबा, काजू पिकांना पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे आंबा कलमांना मोहर येण्याची प्रक्रिया काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या बागेच्या राखणीसाठी गुरखे या परिसरामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे.

या पार्श्वभूमीवर बागायतदारांच्यादृष्टीने फायद्याची गोष्ट असली, तरी परिसरामध्ये संभाव्य धोका टाळण्यासाठी या गुरख्यांची नोंदणी करणे काळाची गरज ठरली आहे. यादृष्टीने धोका टाळण्यासाठी परप्रांतातून येणाऱ्या लोकांची माहिती तातडीने पोलिस ठाण्यात जमा करून घ्यावी अशी मागणी केली आहे. पावस परिसरामध्ये आंबा व मच्छीमार व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे या कामासाठी अनेक मजुरांची आवश्यकता असते. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक मजुरांची संख्या कमी असल्यामुळे या लोकांना व्यवसाय करणे कठीण बनते. अशा वेळी परप्रांतातून येणाऱ्या लोकांना मच्छीमार व्यवसायासाठी त्याचबरोबर आंबाबागांच्या राखणीसाठी नेपाळवरून अनेक गुरखे उदरनिर्वाहासाठी व येथील लोकांना त्यांची गरज असल्याने बोलवले जाते; परंतु अनेक गुरख्यांचा त्यांच्या प्रांतात असलेल्या मतभेदाचा परिणाम या भागात राखण्यासाठी आल्यानंतर कुठल्या ना कुठल्या कारणावरून राग व्यक्त केला जातो आणि त्यातूनच भानगडी निर्माण होतात; परंतु त्या गुरख्यांची कुठेही नोंद नसल्यामुळे त्यानंतर होणाऱ्या भानगडीमध्ये त्यांचा ६ शोध घेणे अवघड बनते. यासाठी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने दरवर्षी आंबा बागायतदारांना आवाहन केले जाते की, आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक गुरख्यांचा आधारकार्ड, मोबाईल नंबर फोटो व त्याची इतर माहिती कोणत्या बागेमध्ये आहे, अशी सविस्तर माहिती देण्याचे आवाहन वारंवार केले जाते; परंतु त्याला अजून प्रतिसाद मिळत नाही.

रोजंदारीच्या निमित्ताने अनेक लोक या परिसरात येत असतात; परंतु त्यातील काही लोक आपापसातील वाद या राखणीच्या माध्यमातून आल्यानंतर परिसरामध्ये काढत असतात. त्याचा परिणाम या परिसरातील कायदा व सुव्यवस्था या गोष्टीवर होतो. त्याला आळा बसावा यासाठी पोलिसपाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावांमध्ये रोजंदारीसाठी येणाऱ्या प्रत्येकाची माहिती पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला योग्य तऱ्हेने प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात होणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यास मदत होईल. रत्नदीप साळोखे, सहायक पोलिस निरीक्षक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 23/Nov/2024