चिपळुणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

चिपळूण : तालुक्यात पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. शहर आणि तालुक्यात काल सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला; मात्र पावसाची रिपरिप सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

चिपळूण शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाचा जोर वाढला तर भातपिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून हजेरी लावली आहे. मंगळवारी रात्री पावसाचा जोर कमी होता. बुधवारी सकाळी तो वाढला. नदीनाले भरून वाहत होते. महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचले होते. गौरी गणपती सणाच्या काळात अधुनमधून मुसळधार पाऊस झाला. यानंतर पावसाने उघडीप घेतली होती; मात्र बुधवारी सकाळपासून पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळी पोफळी परिसरात पावसाने येथील ग्रामस्थांची दणादाण उडाली. सावडे परिसरातही जोरदार पफाऊस झाला. दसपटी, पंधरागावसह खाडीपट्टयात पावसाने जोरदार हजेरी लावली होती.

शिवनदीसह वाशिष्ठी नदीतील पाण्याची पातळी वाढली होती. शहरातून जाणाऱ्या महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचले होते; मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाण्याचा निचरा झाला. मुसळधार पावसाने तालुक्यात कुठेही मोठे नुकसान झाले नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 26/Sep/2024