रत्नागिरी : अपघात टाळण्यासाठी गुरांच्या गळ्यात बांधले रेडियम बेल्ट

रत्नागिरी : रस्ते अपघाताच्या अनेक घटना घडत असतात. यातील अनेक अपघात रात्रीच्या वेळी होतात आणि त्यातही वाहनचालकांना रात्रीच्या अंधारात रस्त्यातील गुरे न दिसल्याने त्यांना धडक बसून होणाऱ्या दुर्घटनांची संख्याही वाढली आहे, त्यातून माणसांबरोबरच प्राण्यांचे मृत्यू होत असतात. हे टाळण्यासाठी उनाड गुरांच्या गळ्यात रेडियम बेल्ट लावल्यास रात्रीही ते सहजपणे दिसू शकतात. त्यासाठी रत्नागिरीत एका दुकानात कामाला असलेल्या सहा तरुणांनी ‘गो सेवा महासेवा’ मानून त्या मोकाट गुरांच्या गळ्यात ‘रेडियम बेल्ट’ लावण्याचे व्रत हाती घेतले आहे.

मागील काही वर्षात मोकाट गुरांचा प्रश्न शहरांसह ग्रामीण भागालाही सतावत आहे. गुरांचे मालक आपल्या गुरांचे संगोपन करण्याऐवजी त्यांना मोकाट सोडून देत आहेत. त्यामुळे या मोकाट गुरांचे वास्तव्य रत्नागिरी शहर परिसरात वाढलेले आहे. मोकाट गुरांचा वावर प्रामुख्याने रस्त्यावर होताना दिसतो. गुरांचे कळप रात्रीच्यावेळी रस्त्यावर ठाण मांडून राहतात, त्यामुळे अनेकदा वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागते.

रस्त्यावरील मोकाट जनावरांचा प्रश्न रत्नागिरीतील अनेक भागांमध्ये भेडसावतो. रस्त्यांवर प्राणी सोडले जाऊ नयेत, यासाठी अनेकदा प्रशासनस्तरावरूनही आवाहन करण्यात आले आहे. मात्र, बहुतांश गुरेमालकांचा या आवाहनाला प्रतिसाद मिळत नाही. प्रशासनाचे प्रयत्नही तोकडे पडत आहेत. पण त्यानंतर कायमस्वरूपी बंदोबस्त होताना दिसत नाही. काही सेवाभावी संस्था अशा गुरांच्या संगोपनासाठी पुढे सरसावलेल्या आहेत. पण त्यांच्यासमोरही काही मर्यादा आहेत.

रस्त्यावर फिरणारी मोकाट गुरे वाहनचालकांना रात्रीच्या अंधारात न दिसल्याने त्यांना धडक बसते. त्यातून त्या गुरांचा मृत्यू होतो. अनेकदा माणसांच्याही जिवाला धोका होतो. हे टाळण्यासाठी रत्नागिरी शहरातील एका कपड्यांच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणांनी ‘गो सेवा महासेवा’ मानून सेवाभावी कार्य हाती घेतलेले आहे, त्यामध्ये अनुप सिंह, सूर्यवीर सिंह, वने सिंह, हिम्मत सिंह, प्रकाश कुमार, प्रवीण कुमार या तरुणांचा समावेश आहे. हे सर्व तरुण दुकानातील काम रात्री संपल्यानंतर या कामासाठी बाहेर पडतात.

शहर परिसरात मेकाट गुरांचा शोध घेतात. या गुरांना पकडणे हे मोठे आवाक्याबाहेरचे काम असते. त्यासाठी रात्रीच्यावेळी जेथे गुरांचा वावर असतो, तेथे जाऊन त्या गुरांना खाद्य पालतात. त्यामुळे ती गुरे थांबतात त्यांचा अंदाज घेत गळ्यात रेडियम बेल्ट मोठ्या खबरदारीने लावला जात असल्याचे अनुप सिंह याने सांगितले.

१०० जनावरांच्या गळ्यात बेल्ट
रेडियम बेल्ट लावल्यास रात्रीही ते वाहनांच्या प्रकाशात चमकत असल्याने सहजपणे दिसू शकतात. शहर व परिसरात आतापर्यंत सुमारे १००हून अधिक मोकाट गुरांच्या गळ्यात या तरुणांच्या टिमने स्वखर्खातून व अन्य प्राणीप्रेमींच्या सहकार्यातून रेडियम बेल्ट बांधले असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे गुरांचे रस्त्यावर येणे थांबविणे शक्य नसले तरी रेडियम बेल्ट लावून त्यांच्यामुळे रात्री होणारे अपघात टाळता येणार आहेत.

रत्नागिरीत दुकानात कामाच्या निमित्ताने असलेल्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून सुरुवातीला २१०० रुपये काढले. त्यातून ५० बेल्ट खरेदी केले. अजूनही या कार्यासाठी कुणी सहकार्य केले तर जास्तीत जास्त बेल्ट खरेदी करून ते बेल्ट मोकाट गुरांना बांधण्याचा प्रयत्न राहणार आहे. जेणेकरून रात्रीच्यावेळी या गुरांमुळे होणारे रस्ते अपघात टाळण्यास मोठी मदत होईल. -अनुप सिंह, रत्नागिरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:11 PM 23/Nov/2024