धर्माच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सामंताना पराभूत करण्याचा प्रयत्न जनतेने हाणून पाडला

रत्नागिरी : मागील काही महिन्यात रत्नागिरीत घडलेल्या काही घटनांचा अर्थ येथील सुजाण मतदारांच्या चांगलाच लक्षात आल्याचे या निकालावरून दिसत आहे. घडलेल्या प्रत्येक घटनेचा संदर्भ उदय समंतांशी जोडत त्यांना सोशल मीडियावरून बदनाम करण्याचा चंग काहीनी बांधला होता. हे सर्व जणू काही येथील जनता जाणत होती हेच सामंतांच्या विजयावरून दिसत आहे. उदय सामंत तब्बल १ लाख ११ हजार ३३५ मते मिळवून विजयी झालेत. हा विजय कोकणातील इतर आमदारांच्या विजयाच्या तुलनेत खूप मोठा आहे.

मागील काही दिवसात धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या काही घटना रत्नागिरीत घडल्या. या प्रत्येक घटनेचा सबंध उदय सामंतांशी जोडण्याचा प्रयत्न काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसत होते. या घडलेल्या घटनांचा राजकीय फायदा उठवून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न देखील काहींकडून सुरू होता. मात्र रत्नागिरीतील सुजाण जनतेने ते ओळखले. मुळात सर्व धर्मियात एकोपा असणारी रत्नागिरीची संस्कृती आहे. धर्मांधता ही येथील जनतेला मान्य नाही. त्यामुळेच दिवसरात्र ओरड करुन उदय सामंतांना बदनाम करुन पराभूत करण्याचा प्रयत्न येथील सुजाण मतदारांनी हाणून पडल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट होत आहे.