रत्नागिरी : मासेमारी व्यवसाय बंद ठेवल्यामुळे मतदान टक्क्यात वाढ

रत्नागिरी : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी साडेतीन टक्क्यांनी वाढली. मासेमारी नौका बंद ठेवल्यामुळे मतदान टक्का वाढण्यास मदत झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांप्रती ‘गुड वर्क’ अशा शब्दात गौरवोद्गार काढले. पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी पालव हेच प्रभारी सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार विविध विभागामार्फत मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाची भूमिका महत्त्वाची ठरली. पाच वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत ६१.२२ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदान साडेतीन टक्क्यांनी वाढून ६५.२३ टक्के इतके झाले आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांनी मतदानाच्या दिवशी मासेमारी नौका समुद्रात जाऊ नयेत यासाठी पाच वर्षांपूर्वी झालेल्या नियोजनाप्रमाणेच कार्यवाही केली.

बंदरावर मासळी विक्री करणाऱ्यांनाही मतदान केल्यानंतरच विक्री करण्यास यावे, अशा सक्त सूचना मत्स्य व्यवसाय विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील मासेमारी मतदानाच्या दिवशी शंभर टक्के बंद होती. पर्यायाने मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. मतदानाच्या दिवशी मासेमारी बंद ठेवण्याबरोबरच मतदान वाढवण्यासाठी हर्णे आणि मिरकरवाडा समुद्रात मच्छीमार नौकांची जनजागृती रॅलीसुद्धा काढण्यात आली होती. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी जनजागृती कार्यक्रमांतर्गत नौकांची रॅली काढली गेली होती. लोकसभा निवडणुकीवेळी पालव सहाय्यक आयुक्तपदी नव्हते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार नौकांची समुद्रातील रॅली होऊ शकली नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या मतदान वाढीसाठी झालेल्या प्रयत्नांची दखल घेऊन ‘गुड वर्क’ अशा शब्दात प्रशंसा केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 25/Nov/2024