रत्नागिरी : कोकण हा बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला. केवळ बाळासाहेब ठाकरेंसाठी लाखो लोक शिवसेनेशी जोडली गेली होती; मात्र गेल्या दोन वर्षांत महाविकास आघाडीमधील अंतर्गत नाराजीचा फटका यंदाच्या विधानसभा निवडणुकीला बसला. त्यातही उद्धव सेनेतील जुने जाणकार शिवसैनिकही नाराज होते. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात ४ पैकी १ जागेवर उद्धव सेनेला यश आले. ४ पैकी ३ जागांवर शिंदे सेनेचे वर्चस्व राहिले, नकळतपणे का होईना खरी शिवसेना ही शिंदे सेनेची, असा कौल कोकणवासीयांनी दिला.
लोकसभेत पाचही मतदारसंघात उद्धव सेनेला मिळालेली आघाडी विधानसभेलाही टिकेल, या विश्वासाला धक्का बसला, भास्कर जाधव यांच्या रूपाने उद्धव सेनेला एकमेव विजय जिल्ह्यात मिळाला. रत्नागिरी विधानसभेसाठी शिवसेनेचे उदय बने इच्छुक होते. त्यांनी जि. प. उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यांचा ग्रामीण भागातील संपर्कही चांगला होता. मात्र, त्यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले नाही.
भाजपचे निष्ठावान नेते बाळ माने यांनी विधानसभा निवडणुकीच्या महिनाभर आधी तिकिटासाठी उद्धव सेनेत प्रवेश केला आणि येथूनच उद्धव सेनेतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली. बाळ माने यांनी महिनाभर प्रचारही केला. कार्यकत्यांना विश्वासात्तही घेतले. मात्र, त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. पुन्हा जिल्ह्यात ‘सामंत पॅटर्न’ चा उदय झाला.
या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव सेनेतील शेकडो नाराज पदाधिकाऱ्यांनी आमदार उदय सामंत यांच्या उपस्थित प्रवेश केला. दापोली मतदारसंघातही चांगला प्रचार करूनही संजय कदमांना हार पत्करावी लागली.
योगेश कदम यांचा मोठा जनसंपर्क आणि मुंबईतील चाकरमानी यांची साथ या निवडणुकीच्या यशाचे कारण ठरले. गुहागरामध्ये भास्कर जाधव केवळ २८३० मतांनी निवडून आले. पहिल्याच विधानसभेच्या निवडणुकीत शिंदे सेनेचे उभे राहिलेले राजेश बैंडल यांना कुणबी समाजाची मोठी साथ लाभली. भास्कर जाधव हे एकतर्फी निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र, बैंडल यांनी सगळ्यांना धक्का दिला. मात्र, काठावर पास होत भास्कर जाधव यांना यश मिळाले.
राजापूर मतदारसंघात तर निष्ठावंत शिवसैनिक राजन साळवी यांचा पराजय उद्धव सेनेसाठी मोठा धक्का होता. गेल्या ३ टर्म या मतदारसंघात राजन साळवी यांची मक्तेदारी शिंदे सेनेचे किरण ऊर्फ भैय्या सामंत यांनी मोडून काढली आणि १९६७७ च्या मताधिक्याने भैय्या यांनी दणदणीत विजय मिळवला.
राजापूरमध्ये लोकांना बदल हवा होता. या ठिकाणी उद्धव सेनेत अंतर्गत नाराजी होती.
चिपळूणमध्ये अजित पवार गटाचे शेखर निकम आणि शरद पवार गटाचे प्रशांत यादव यांच्यात चांगलीच लढत झाली. सुरुवातीपासून प्रशांत यादव आघाडीवर होते. मात्र, देवरुख, संगमेश्वरमधील मताधिक्य शेखर निकम यांच्या बाजून होते, त्यामुळे ते ६,८६७ च्या मताधिक्याने निवडून आले.
रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेना मजबूत करण्यासाठी उदय सामंत यांची रणनीती या निवडणुकीत यशस्वी ठरली. त्यांनी स्वतःचा आणि आपले मोठे बंधू किरण सामंतांचा प्रचार न करता शिंदे सेनेच्या इतर उमेदवारांचे प्रचार केला. आपला पक्ष अधिक मजबूत कसा होईल, याकडे लक्ष दिले त्यामुळे ४ पैकी ३ मतदारसंघावर शिंदे सेनेचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
आता पुढील तयारीचे वारे
या विधानसभा निवडणुकीचा १०० टक्के परिणाम नगर परिषद आणि जि. प. निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे. रत्नागिरी जि. प. उद्धव सेनेचे वर्चस्व होते आणि नगर परिषदेवरही त्यांचेच वर्चस्व होते. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिंदे सेनेचे वर्चस्व निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापासूनच नगर परिषद आणि जि. प. निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 25/Nov/2024













