चिपळूण : जागतिक पर्यटन दिनाच्या पुर्वसंध्येला चिपळूण पालिका आणि शहरातील विविध पर्यटन संस्थांच्या वतीने गुरूवारी २६ रोजी शांततामय चिपळूण पर्यटन या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमीत्ताने पर्यटन विषयक काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जाणार असून शहरात कोण-कोणत्या पद्धतीचे पर्यटन वाढू शकते, त्याचे सादरीकरणही पीपीटीच्या माध्यमातून केले जाणार आहे. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रात सायंकाळी ४ ते ७.३० दरम्यान हा कार्यक्रम होणार असून शासनाच्या पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती पालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
येथील ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, कोकण भूमी पर्यटन सहकारी संस्था,सह्याद्री निसर्ग मित्र, अॅक्टिव्ह ग्रूप आणि चिपळूण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक २६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात जंगल आणि पर्यावरण पर्यटन, आदरतिथ्य व्यवसाय, कृषी पर्यटन, सांस्कतीक पर्यटन,नदी जल पर्यटन, साहसी पर्यटन, धार्मिक आणि वारसा स्थळे, पर्यटन क्षेत्रातील संधी यावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. चिपळूणात कोणत्या पद्धतीचे पर्यटन होऊ शकते, याबाबत शहरातील पर्यटनाची शक्तीस्थळांची माहिती दिली जाणार आहे. पर्यटन हा एकदिवसीय सोहळा नसून ते उदरनिर्व्हाचा शाश्वत मार्ग आहे. शहरवासीयांनी हा दिवस साजरा करण्याच्या निमीत्ताने एकत्र येऊन पुढील कालावधीत विविध उपक्रम राबवावे असा पालिका आणि पर्यटन संस्थांचा मानस आहे. या उपक्रमात सातत्य राहण्यासाठी चिपळूण पर्यटन नावाने संस्थेचा शुभारंभ केला जाणार आहे. या पर्यटन विकास प्रक्रीयेच्या प्रवासात, उपक्रमात शहरातील संस्था, क्लब, मंडळे, बचत गट, शाळा, महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक संघ, आदी विविध संघटनांनी सहभागी ह्वावे असे आवाहन करण्यात आले.
चिपळूणचा सर्वागिण विकास हा स्वच्छ चिपळूण- सुंदर चिपळूण आणि आकर्षक पर्यटन यामुळे होऊ शकतो. त्यासाठी नव्याने स्थापन होणारी संस्था आणि पालिका वर्षभर विविध उपक्रम राबवणार आहेत. चिपळूणचे अर्थकारण, चिपळूणचा सर्वार्गिण विकास, स्वच्छ व सुंदर चिपळूण ही शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ग्लोबल चिपळूण टुरिझमचे संचालक रामशेठ रेडीज यांनी केले.
पालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेस भाऊ काटदरे, मिनल ओक, विश्वास पाटील, आदिती देशपांडे, समीर कोवळे, विलास महाडीक, व पालिकेचे बापू साडविलकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 26-09-2024