रत्नागिरी : फलोत्पादन जिल्हा म्हणून रत्नागिरीची घोषणा झाल्यानंतर फळबाग लागवडीला चालना मिळाली. डोंगरावर, कातळावर फळबाग लागवड वाढू लागली. पावसाळ्यानंतरच्या प्रखर उन्हात कलमे जगविण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करणे शक्य नसल्याने ठिबक सिंचनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. पावसाळी शेतीवर अवलंबून न राहता बागायतीमधील आंतरपिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. शिवाय विविध पिके घेणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. शेतीसाठी ठिबकचा वापर बहुतांश शेतकऱ्यांनी करावा, यासाठी शासनातर्फे ‘मागेल त्याला ठिबक’ योजना राबविण्यात येत आहे.
डोंगर उतारावरील जागेची निगा राखण्यासाठी भरपूर खर्च असल्याने शेतकऱ्यांनी बँकेचे अर्थसहाय्य घेऊन शासनाच्या विविध अनुदानाचा वापर करीत कलमबागा विकसित केल्या आहेत. रस्त्यालगत, पाणवठ्यालगतच्या लागवडीत समस्या उद्भवली नाही. मात्र, कातळावरील लागवडीचा प्रश्न होता. पाण्याअभावी झाडे जगत नसल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी विहीर असलेल्या फळबागांसाठी ठिबक, तुषार सिंचन पद्धत अनुदानावर उपलब्ध करून दिली आहे. शासनाने ‘मागेल त्याला ठिबक सिंचन’ यावर भर दिला आहे. डोंगर उताराच्या जागेमुळे विहिरीचा प्रश्न, शिवाय भरपूर अंतरावर पाणी नेण्यासाठी पाईपचा खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांना एकाचवेळी खर्च करणे परवडत नाही. डोंगराळ भागात ठिबक सिंचन योजना फायदेशीर असली तरी डोंगराळ भागामुळे खर्चिक आहे. सर्वसाधारण गटासाठी ३५ टक्के तर अनुसूचित जाती, जमाती व महिला शेतकऱ्यांसाठी ४५ टक्के अनुदान शासनाकडून दिले.
योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. २०२३- २४ मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली होती. तरीही ठिबकसाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. गतवर्षीच्या २७९ शेतकऱ्यांपैकी ८३ शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली होती. त्यातील ७६ शेतकऱ्यांनी बिले अपलोड केल्याने ५७ शेतकऱ्यांच्या खात्यात १० लाख ९८ हजार ६७४ रुपये जमा झाले आहेत. उर्वरित १९ शेतकऱ्यांची रक्कम लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 25/Nov/2024













