रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर पराभूत झालेल्या उमेदवारांच्या समर्थकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आदेशाने त्या दिवशी दुःख हलके करू दिले नाही. त्याचबरोबर विजयी उमेदवारांच्या समर्थकांना आनंदोत्सव साजरा करण्यासाठीही संधी मिळाली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या दिवशी शनिवारी संपूर्ण दिवस कोरडा दिवस (ड्राय डे) म्हणून जाहीर केला होता. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व परमीट रुम, वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारू दुकाने बंद होती.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर मद्याचा प्रभाव पडू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १९ आणि २० नोव्हेंबर रोजी ड्राय डे जाहीर केला होता. यावेळी सर्व मद्य विक्रीच्या दुकानांच्या कुलपांवर सील लावण्यात आले होते. मतदान प्रक्रिया संध्याकाळी संपल्यानंतर दुकाने उघडण्याची परवानगी होती. त्याचप्रमाणे मतदान प्रक्रिया संध्याकाळी ६ वा. पूर्ण झाल्यानंतर मद्य दुकाने सुरु करण्यासाठी परवानगी देणारा आदेश होता. परंतू मतमोजणीच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ड्राय डेचा नवीन आदेश निघाला. या बदललेल्या आदेशानुसार मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस दुकाने बंद ठेवावी लागली. त्यामुळे निकाल स्पष्ट झाल्यानंतर विजयी आणि पराभूत उमेदवारांचे समर्थक मद्य दुकानांमध्ये फेऱ्या मारत होते.
निवडणुकीतील प्रत्येक उमेदवाराचे समर्थक आणि विरोधक असतात. ज्यांचा उमेदवार विजयी होतो ते समर्थक आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मद्यसेवन करतात. त्याचवेळी पराभूत उमेदवाराचे समर्थक दुःख हलके करण्यासाठी मद्याचा आधार घेत असतात. ‘ड्राय डे’मुळे दुकाने बंद असल्यामुळे मद्यप्रेमींचा हिरमोड झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 25/Nov/2024













