रत्नागिरी : काही वर्षे रखडलेल्या परंतु आता वेगाने काम सुरू असलेल्या रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचे काम काही महिन्यातच अंतिम टप्प्यात आले. विनाखंड काम सुरू असल्याने ते लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटी महामंडळाकडून सुरवातीला या बसस्थानकाचे काम सुरू करण्यात आले. परंतु त्याकाळात कोरोना महामारी आली. त्याचा मोठा परिणाम कामावर झाला. त्यानंतर हे काम रखडले ते रखडले. मात्र त्याचा त्रास प्रवाशांना होत होता. उन्हा, पावसात रस्त्यावर उभे राहावे लागत होते. या प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात होती. परंतु ठेकेदार वाढीव रक्कम मंजूर करूनही त्याची देयके थकल्याने काम सुरू झाले नव्हते. अखेर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून निधी मंजूर करून दिला. त्यानंतर रखडलेल्या बसस्थानकाच्या कामाला सुरवात झाली. १८ कोटीच्या दरम्यान या बसस्थानकाच्या कामाचे अंदाजपत्र आहे.
स्थानिक ठेकेदाराला देऊन टाईमबॉण्डमध्ये हे काम करून घेण्याचा निर्णय सामंत यांनी घेतला. गेली आठ वर्षे हे काम रखडले होते. परंतु आता हे काम वेगाने सुरू आहे. हायटेक बसस्थानकाचे छप्पर टाकून पूर्ण झाले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये बसस्थानकाचे काम पुर्ण होऊन ते प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यातील बसस्थानकांसाठी ८० कोटी निधी
पालकमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यातील बसस्थानकांसाठी सुमारे ८० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. यामध्ये रत्नागिरी मुख्य बसस्थानकाचा समावेश होता. एमआयडीसीकडून निधी प्राप्त होताच तातडीने बसस्थानकाच्या कामाला सुरवात केली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:06 25-11-2024














