चिपळूण मतदारसंघात उभा राहणार नवा राजकीय संघर्ष?

चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आ. शेखर निकम यांनी गेल्या दहा वर्षांत मतदारसंघावर निर्माण केलेली पकड आणि महायुतीच्या काळात अडीच हजार कोटींची मंजूर केलेली कामे या ताकदीवर ते निवडणूक पार करतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना विजयासाठी त्यांच्या ‘होम पिचवर’ झगडावे लागले. संगमेश्वरवासीयांनी निकमांना तारले. त्यामुळे आगामी काळात निकमांसाठी हा मतदारसंघ कायमस्वरूपी बांधण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

महायुतीने आणलेली लाडकी बहीण योजना आ. शेखर निकम यांच्या पथ्यावर पडली. आ. निकम यांनी गेल्या पाच वर्षांत आधीची अडीच वर्षे महाविकास आघाडीबरोबर आणि त्यानंतर राजकीय समीकरणे बदलून अजितदादा पवार यांची सोबत केली.

सुरुवातीची अडीच वर्षे महाविकास आणि पुढची अडीच वर्षे महायुती अशा दोन वेगवेगळ्या राजकीय व्यासपीठावर आ. शेखर निकम यांनी सत्तापक्षात काम केले.

या आधीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष झाला होता. त्यावेळी शिवसैनिक निकम यांच्याविरोधात होते. मात्र, यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची दोन शकले झाली होती. जवळचे कार्यकर्ते लांब आणि लांबचे कार्यकर्ते जवळ असा प्रकार होता. त्यातून निवडणूक लढविणे महत्त्वाचे होते. विद्यमान आमदार म्हणून त्यांना लढावेच लागणार होते. त्यामुळे त्यांनी अजितदादांच्या माध्यमातून विकासकामांचा रतीब लावला. पाणी योजना, बंधारे, धरण, पूरप्रश्न हाताळण्यामध्ये त्यांनी कसर सोडली नाही. चिपळूण, देवरूख शहरांसाठीदेखील प्रथमच इतका निधी आणला गेला. इतकेच काय, अल्पसंख्याक समाजासाठीदेखील त्यांनी प्रत्येक मोहल्ल्यात निधी दिला हे नाकारून चालणार नाही. दांडगा संपर्क आणि प्रत्येक गावात विकास निधी या बळावर आपण सहज निवडून येऊ. असा त्यांचा विश्वास होता. मात्र, या निकालाने काहीअंशी तडा गेला आहे.

शेखर निकम सात हजार मतांनी विजयी झाले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार प्रशांत यादव यांनीदेखील ८० हजार मते घेतली आहेत. यादव यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही. आधी काँग्रेस तालुकाध्यक्ष आणि त्यांनतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळाली. खरे तर या मतदारसंघाचा त्यांना अनुभवच नाही. फक्त शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात पेरणी केली. मात्र, त्यांचा अनुभव कमी पडला आणि सलग तिसरी निवडणूक लढविणारे शेखर निकम यांनी बाजी मारली. एका बाजूला सत्ताधारी पक्षाचे दोन टर्मचे आमदार आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या निवडणुकीची तयारी, त्यामुळे चिपळूण मतदारसंघात आता नवा राजकीय संघर्ष उभा राहणार आहे.

चिपळुणातून आघाडीला अवघी एक हजाराची आघाडी
चिपळूण शहराने आजवर माजी आ. रमेश कदम यांच्यावर कायम विश्वास ठेवला. अनेक निवडणुकांमध्ये चिपळूण शहर कदम यांच्या पाठीशी राहिले. यावेळीदेखील तोच अनुभव आला. रमेश कदम यांनी प्रशांत यादव यांना भक्कम पाठिंबा दिला होता. गत विधानसभा निवडणुकीत शेखर निकम यांना शहरातून सहा हजार मतांची आघाडी होती. मात्र, यावेळी विकासकामे करूनदेखील ती आघाडी राखता आली नाही. कदम यांनादेखील यादव यांच्यासाठी फारशी आघाडी देता आली नाही. शहरातून प्रशांत यादव यांना अवघे एक हजाराचे मताधिक्य मिळाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:06 PM 25/Nov/2024