खेड आगाराला कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ९ लाख ६४ हजारांचे उत्पन्न

खेड : कार्तिकी एकादशीसाठी तालुक्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची सर्वाधिक संख्या लक्षात घेत येथील एसटी प्रशासनाने पंढरपूरला ६० बस फेऱ्या सोडून वारकऱ्यांची चोख व्यवस्था केली. या बस फेऱ्यांमुळे येथील आगारास ९ लाख ६४ हजार ९९७ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दिली.

गतवर्षीच्या तुलनेत अधिक म्हणजेच यंदा एसटी प्रशासनाने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ६० फेऱ्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले होते. परतीच्या प्रवासातही बस फेऱ्या धावल्याने वारकऱ्यांची चांगली सोय झाली. ११ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ग्रामीण भागातून पंढरपूरला बस फेऱ्या रवाना झाल्या होत्या. भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली होती.

पंढरपूरला जाण्याकरिता वारकऱ्यांनी एसटी प्रशासनाकडे बसेस आरक्षित केल्या होत्या. वारकऱ्यांची संख्या वाढल्याने एसटी प्रशासनाने जादा बस फेऱ्या उपलब्ध करून दिल्या. या बस फेऱ्यांमुळे ग्रामीण भागातील ४० बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. सलग ४ दिवस ग्रामीण भागातील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना फटका बसला होता. बस फेऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊन उशिराने धावलेल्या बस फेऱ्यांमुळे प्रवाशांची गैरसोयही झाली होती. बस फेऱ्यांअभावी खासगी वाहनांचा आधार घेत प्रवाशांना इच्छित स्थळ गाठण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता. १५ नोव्हेंबरपासून बस फेऱ्या पूर्ववत होताच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला सोडण्यात आलेल्या जादा बस फेऱ्यांतून ९ लाख ६४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने एसटी प्रशासनाची आर्थिक तूट भरून निघाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 25/Nov/2024