रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाने रखडलेल्या कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. रस्त्यांवरच खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीची धावपळ सुरू झाली आहे. त्यासाठी आवश्यक असणारी घरपट्टी, पाणीपट्टीची मागणी बिले रविवारी सुट्टीच्या दिवशी घरोघरी जाऊन देण्यात आली. त्यामुळे वर्षभरापासून थकीत घरपट्टी, पाणीपट्टी धारकांवर तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू होण्याची लक्षणे आहेत.
रत्नागिरी शहरातील अनेक रस्त्यांवरचे खड्डे भरणे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत तेथे डांबरीकरण पॅच मारण्याचे काम करण्यात आले होते. पंच मारलेल्या रस्त्यांवर ग्रीट टाकण्याचे काम राहिले होते. हे काम सुरू झाले असून, राहिलेल्या ठिकाणचे खड्डेही भरले जात आहेत. रत्नागिरी नगरपरिषदेत कर्मचारी, अधिकारीवर्ग फारच कमी आहे. त्याचवेळी निवडणूक तोंडावर असल्याने उपलब्ध अधिकारी, कर्मचारीवर्ग विविध विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील होता. निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर हा अधिकारी, कर्मचारीवर्ग निवडणूक कामामध्ये गुंतला गेला. त्यामुळे घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीकडे लक्ष देता आले नाही.
शनिवारी निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर लगेच रविवारी रत्नागिरी शहरात घरपट्टी, पाणीपट्टीची मागणी बिले वितरीत करण्यात आली. त्यामुळे आता गेल्या वर्षभरातील थकीत बिलांच्या वसुलीसाठी जी कारवाई करता आली नाही ती आता लवकरच सुरू होण्याची लक्षणे आहेत.
वर्षभर पाणीपट्टीची बिलेच नाहीत
रत्नागिरी शहरात नळ जोडण्यांना नवीन जलमापक जोडण्यात आले. अशा अनेक ठिकाणच्या ग्राहकांना गेल्या एक ते दीड वर्षापासून पाणीपट्टीची मागणी वेळीच पाठवण्यात आलेली नाहीत. अनेक नळधारक पाणी विभागात जाऊन पाणीपट्टीची बिले मागत होते. परंतु, गेल्या एक-दीड वर्षात जी पाणी बिले मिळाली नाहीत, ती आता मिळणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 25/Nov/2024














