खेड रेल्वेस्थानक सुशोभीकरणाचे काम लोकार्पणानंतरही अपूर्णच

खेड : येथील रेल्वेस्थानकाच्या सुशोभीकरणासह रेल्वेस्थानक रस्ता कामाच्या लोकार्पणानंतर दीड महिन्याचा कालावधी लोटूनही सुशोभीकरणाचे काम अपूर्णावस्थेत आहे. तसेच सुशोभीकरणातील कामात सर्वत्र अस्वच्छता असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे भागातील स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रेल्वेस्थानकाच्या सुशोभीकरणासह रस्ता कॉक्रिटीकरणासाठी ९ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या देखरेखीखाली सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. मात्र कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित उपस्थित केले जात आहेत.

स्थानकाच्या आवारात रेल्वे इंजिनची कलाकृती, राष्ट्रीय पक्षी मोर, शिवसृष्टीसह लक्षवेधी कलाकृती, रिक्षा व्यावसायिकांसह प्रवाशांच्या दुचाकींसाठी, चारचाकी वाहनांसाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था यामुळे तब्बल २९ वर्षांनी स्थानकाचा पूर्णपणे कायापालट झाला; मात्र सुशोभीकरणाचे काम अपूर्णावस्थेत असतानाही लोकार्पणाची घाई करण्यात आल्याने सद्यः स्थितीत प्रलंबित कामे मंद गतीने सुरू आहेत.

एका बाजूकडील काम पूर्णतः अर्धवट आहे. स्थानक परिसरात एकीकडे सुशोभीकरणामुळे सुटसुटीतपणा आलेला असतानाच दुसरीकडे मात्र अस्वच्छता निर्माण झाली आहे.

कामाच्या दर्जाबाबत साशंकता
खेड रेल्वेस्थानक सुशोभीकरणाच्या लोकार्पणानंतर दोन ते तीन वेळा झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीत छताला गळती लागली होती. यामुळे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कामाचा दर्जा राखण्यासाठी प्रशासनाकडून कुठल्याच ठोस उपाययोजनांचा अवलंब करण्यात आलेला दिसून येत नसल्याने याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 25/Nov/2024