लांजा : माझी लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीने राबवली गेली त्यामुळे लाडक्या बहिणींनी आणि युवकांनी भरभरून आशीर्वाद दिले. ज्या भागात आम्ही प्रकल्प आणले तेथील जनताही पाठीशी राहिली. जनतेचा वाढता पाठिंबा पाहता विरोधकांनी आमच्या विरोधात जो फेक नरेटिव्ह निर्माण केला होता, त्याला आपण सर्वांनी मिळून तिलांजली दिली. त्यामुळेच राज्यात महायुतीच्या २३० पेक्षा जास्त जागा आम्ही निवडून आणल्या, ज्यांनी सामंत यांना संपवण्याची गर्जना केली होती, त्यांचाच अस्त आज जनतेने केला आहे, असा टोला आमदार उदय सामंत यांनी लांजा येथे लगावला.
लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे विजयी झालेले उमेदवार किरण सामंत यांचे राज्याच्या वतीने अभिनंदन करण्यासाठी उदय सामंत लांजा येथे शनिवारी सायंकाळी आले होते. याप्रसंगी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीसाठी मोठ्या ताकदीने प्रयत्न केले. त्यामुळेच महाराष्ट्रात महायुतीने जास्त जागा मिळवल्याने आम्ही पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन करत आहोत. यामध्ये मुंबईसह कोकणाचा सहभाग मोठा प्रमाणात राहिला आहे. सिंधुदुर्गच्या तीन जागा, तर रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी चार जागा आम्ही जिंकलो आहोत. रायगडमध्ये सर्व उमेदवार महायुतीचे निवडून आले आहेत. मुंबईसह कोकणाचा जवळ जवळ ८० टक्के स्ट्राईक रेट राहिला आहे.
राजापूर विधानसभा मतदारसंघातून किरण सामंत यांना जनतेने निवडून दिले आहे. लांजा राजापूर-साखरपा मतदारसंघात गेली पंधरा वर्षे रखडलेल्या विकासाला किरण सामंत यांच्या माध्यमातून आता चालना मिळणार आहे. एकंदरीत महायुतीला जनतेने भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे जनतेच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेता बनवायला शुभेच्छा
महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना त्यांचा विरोधी पक्षनेता बनवायला शुभेच्छा देतो. जे स्वतःचा विरोधी पक्षनेता बनवू शकत नाहीत ते आमच्यावर आगपाखड करत आहेत त्यांना जनतेने चोख उत्तर दिले आहे, असा खोचक चिमटाही सामंत यांनी काढला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:21 PM 25/Nov/2024













