रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी पासून रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उत्साही कार्यकर्त्यांसह हुल्लडबाजांवर पोलिस लक्ष ठेऊन होते. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
जिल्ह्यात शनिवारी मतमोजणी पुर्ण झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली होती. वाहनांची तपासणी करण्याबरोबर मद्यपींवरही कारवाई करण्यात आली. शनिवारी पहाटेपासून मतमोजणी केंद्रासह जिल्ह्यात चौकाचौकांत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मतमोजणीच्या ठिकाणी वेगेवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली होती. जस जसा निकाल लागण्यास सुरुवात झाली तशी उत्साही कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. त्यावर पोलिस लक्ष ठेऊन होते. वाहनांचे सायलन्सर काढून उल्लडबाजी करण्यावर पोलिसांनी रोख लावला होता.
विजयी उमेदवारांनी मिरवणूक काढू नये साठीचेही नियोजन करण्यात आले होते. तसेच सोशल मीडियावरही पोलिस लक्ष ठेऊन होते. रात्री उशिरा पर्यंत हा पोलिस बंदोबस्त तैनात होता. काही संवेदनशील ठिकाणी पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
पोलिस दलाचे कौतुक
आचारसंहिता लागल्यापासून निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत पोलिसांनी डोळ्यात तेल घालून बंदोबस्त केला. त्यामुळे निवडणूक शांततेत पार पडली. याबद्दल जिल्हा पोलिस दलाचे नागरिकांतून कौतुक होत आहे. जिल्हा पोलिसप्रमुखांनीही आपल्या सहकारी व कर्मचारी आधिकारी यांचे कौतुक केले. एकंदरीत पोलिसांचा निवडणुकीचा ताण कमी झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:24 25-11-2024














