राष्ट्राची आधार कोनशिला म्हणजे संविधान : अॅड विलास पाटणे

रत्नागिरी : राष्ट्राची आधार कोनशिला म्हणजे आपले संविधान. भारताच्या या संविधानाला आज (ता. २६) संविधानदिनी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ ला संमती दिली. भारताच्या या सर्वात मोठ्या लिखित घटनेची गेली ७५ वर्षे अव्याहतपणे वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी केले.

संविधानदिनाच्या पूर्वसंध्येला अॅड. पाटणे म्हणाले की, कायद्याचे राज्य, जगण्याचे स्वातंत्र्य, लोककल्याणकारी राज्य, न्यायालयाचे स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्क याची ग्वाही आपल्या संविधानाने दिली. संविधान म्हणजे तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नाही; परंतु संविधानाचे तत्त्वज्ञान उद्देशिकेत असते. इंग्रजीत त्याला प्रिएंबल म्हणतात. आपली उद्देशिका सामाजिक न्यायाची भलावण करते. आपली उद्देशिका राष्ट्राची एकता, बंधुभाव आणि एकात्मतेची जाणीव देते. ७५ वर्षांच्या वाटचालीत या अद्वितीय दस्तवेजात साधारणतः १२५ वेळा दुरुस्ती झाली आहे. मूलभूत अधिकार सोडून संविधानात दुरुस्ती करणे हे राज्यघटनेचे सामर्थ्य आहे. ४२व्या घटना दुरुस्तीने घटना बदलण्याचा डाव रचण्यात आला; परंतु पुढे ४४व्या घटना दुरुस्तीने ती दुरुस्ती रद्द झाली. शेवटी आपण संविधान कसे वापरतो आणि आपल्या सार्वभौम राष्ट्राच्या लोकशाहीचे संरक्षण कसे करतो यावरच घटनेचे महत्व अधोरेखित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 26/Nov/2024