Ratnagiri : जिल्ह्यात साडेनऊ हजार मतदारांनी उमेदवारांना नाकारले; रत्नागिरीत सर्वाधिक नोटाला पसंती

रत्नागिरी : पाच विधानसभा मतदार संघात भाग्य आजमावणाऱ्या ३८ उमेदवारांपैकी एकही उमेदवार ९ हजार ५४१ मतदारांना रूचलेला नाही.

त्यामुळे त्या मतदारांनी नोटाचा उपयोग केलेला आहे. नोटाला सर्वाधिक पसंती दर्शवणारे ३ हजार ७३ मतदार रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील आहेत.

निवडणूक रिंगणात असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार मतदाराला आवडत नसेल तर अशा मतदारांसाठी निवडणूक आयोगाने नोटाचा पर्याय ठेवलेला आहे. नोटा म्हणजे ‘नन ऑफ दी अबोव्ह’ असा अर्थ होतो. ईव्हीएमवर सर्व उमेदवारांचे नाव व पक्ष चिन्हाच्या खाली नोटाच्या बटणाचा पर्याय असतो. २००९ मध्ये निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला नोटाचा पर्याय मतदारांना उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर नागरी हक्क संघटना पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टिज या स्वयंसेवी संघटनेने नोटाचे समर्थन करणारी जनहित याचिका २०१३ मध्ये न्यायालयात दाखल केली. त्यानंतर २०१३ मध्ये न्यायालयाने मतदारांना नोटाला पर्याय देण्याचे आदेश दिले. त्यानंतर ईव्हीएममध्ये नोटाच्या बटणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. निवडणूक आयोगाने ज्या मतदारांना एकही उमेदवार पसंतीस पडलेला नाही अशांना ”नोटा” हा पर्याय मतदान यंत्रावर उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायाचा मोठ्या प्रमाणात उपयोग मतदार करत असल्याचेही निवडणुकीत दिसून येते.

विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्यात नोटाला पसंती देणाऱ्या मतदारांची संख्या किती राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, दापोली तब्बल ९ हजार ५४१ मतदारांनी नोटाला पसंती दर्शवली आहे. या निवडणुकीत नोटाला किती मते पडणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते; परंतु एकूण झालेल्या मतदानाचा विचार करता नोटाला टाकणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्येही दोन विधानसभा मतदार संघात नोटाची मते अपक्ष उमेदवारांपेक्षा अधिक आहेत. नोटाला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याची नोंद झालेली आहे.

मतदार संघनिहाय नोटाला पडलेली मते
*राजापूर- १८३४
*रत्नागिरी- ३०७३
*चिपळूण- २३२०
*गुहागर – ११९७
*दापोली – १११७

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 26-11-2024