रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील राजीवडा गावातून जाणाऱ्या रस्त्यावर आलेल्या अतिक्रमणाची उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसह रत्नागिरी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी ही पाहणी करण्यात आली. शहरविकास आराखड्यानुसार ९ मीटरचा रस्ता अनधिकृत बांधकामामुळे ९ फूट इतकाच राहिला असल्याचे दिसून आले आहे.
राजीवडा गावातच राहणाऱ्या एका रिक्षा व्यावसायिकाने राजीवड्यातील अरुंद रस्त्यावर असलेल्या रिक्षा थांब्यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली. या निवेदनात सर्व अतिक्रमण हटवण्याचीही मागणी केली. गेल्या दीड-दोन वर्षांपासून या तक्रारदार रिक्षा व्यावसायिकाकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि रत्नागिरी नगर परिषदेकडे पाठपुरावा केला जात होता.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि रत्नागिरी नगर परिषदेने प्रथम तक्रारीची दखल घेण्यास टाळाटाळ केली. परंतु या रिक्षा व्यावसायिकाने वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या. अखेर मतदान होण्यापूर्वी काही दिवस अगोदर नगर परिषद आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात जावून रस्त्याची पाहणी केली.
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून झालेल्या या पाहणीत विकास आराखड्यातील ९ मीटरचा रस्ता ९ फूटांवर आला आहे. अनधिकृत बांधकामांमुळे हा रस्ता अरुंद झाला असल्याचे दिसून आले आहे.
या बाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून एक अहवाल बनवला जात असून तो अहवाल जिल्हाधिकारी आणि रस्ता सुरक्षा समितीला सादर केला जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी आणि समितीकडून येणाऱ्या निर्देशांप्रमाणे कारवाई केली जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 26/Nov/2024














