देवरूखमध्ये उभी राहतेय देशातील पहिली ‘हॉर्नबिल फूड प्लान्ट नर्सरी’

चिपळूण : ‘हॉर्नबिल’ अर्थात प्रचलित मराठी भाषेत धनेश नावाने तर कोकणी भाषेत ककणेर नावाने ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती व अस्तित्व वाढविण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे ‘हॉर्नबिल फूड प्लान्ट नर्सरी’ उभारली जात आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प असून, ककणेर या पक्ष्याचे अस्तित्व आणि प्रजाती हळूहळू दुर्मीळ होण्याची शक्यता असून, हा पक्षी काही वर्षांनी केवळ पुस्तकातील चित्रातच दिसेल अशी चिंता पर्यावरणप्रेमी, पक्षी अभ्यासकांकडून व्यक्त होत असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व देवरूख येथील पक्षीमित्रांनी धनेशची प्रजाती व अस्तित्व कायम ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार देवरूख येथील आठल्ये सप्रे महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी पर्यावरणप्रेमींसाठी कार्यशाळा झाली.

ककणेर या पक्ष्याचे मुख्य खाद्य म्हणजे वड, पिंपळ, उंबर अर्थातच फायकल्स जातीतील वृक्षांचा समावेश होतो. या झाडांची फळे खाऊन वंशवृद्धीसह आपले अस्तित्त्व राखत असतात. मात्र, विकासाच्या वाटेवर हे वृक्ष उभे असल्याने त्यांची आता कत्तल होऊ लागली आहे. परिणामी ककणेर प्रजातीमधील पक्ष्यांचे जीवनावश्यक खाद्यान्न संपू लागले आहे. त्यामुळे भविष्यात ककणेरची प्रजाती हळूहळू दुर्मीळ होत नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची चिंता पर्यावरण, निसर्गप्रेमी व पक्षीमित्रांकडून व्यक्त होत आहे.

त्याचबरोबर पाचाड (ता. चिपळूण) नार्वेकर सॅन्च्युरीच्या माध्यमातून नितीन नार्वेकर यांनी आपल्या मुलासह खासगी जंगल क्षेत्रात फायकल्स जातीतील झाडे वाढविण्यास सुरुवात केली आहे. ही झाडे केवळ पक्ष्यांच्या विष्ठेतूनच वाढतात आणि जगतात. हे लक्षात घेऊन या निसर्गप्रेमीनी विष्ठा गोळा करून बीजारोपण सुरू केले आहे. हॉर्नबिलच्या ऐंशी ठिकाणच्या घरट्यांजवळ कॅमेरे बसवून त्याचा अभ्यास करण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे.

या वृक्षांची लागवड आणि वाढ होण्यास किमान पन्नास वर्षांचा कालावधी लागतो असे अभ्यासकांचे म्हणणे आहे तर हॉर्नबिल याचे आयुर्मान तीस ते पस्तीस वर्षांचे आहे. त्यामुळे एखादी हॉर्नबिलची प्रजाती व कुटुंब त्याच्या आयुर्मानाच्या कालावधीत त्यांना पोषक असलेल्या खाद्यान्न झाडांची फळे उपलब्ध न झाल्यास ती संपूर्ण पिढी नामशेष होऊ शकते. कारण त्या पिढीच्या अस्तित्त्वादरम्यान असलेली वड, उंबर, पिंपळ ही झाडे नष्ट झाल्याने त्यांच्या एका पिढीचे अस्तित्व संपुष्टात येते तर त्यानंतर ही झाडे लावण्यास व पूर्ण वाढ होण्यास ५० वर्षांच्या कालावधीत योगायोगाने दुसऱ्या पिढीचे अस्तित्व राहिले तर प्रजातीची वंशवृद्धी होईल.

हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता देवरूख येथील पक्षी, पर्यावरणप्रेमी प्रतीक मोरे, चिपळूणमधील पक्षी अभ्यासक नयनीश गुढेकर, पाचाड (ता. चिपळूण) येथील नार्वेकर सॅन्च्युरीचे नितीन नार्वेकर, त्याचबरोबर डीबीजे महाविद्यालयातील वनस्पती विषयक अभ्यासक प्रा. बाबर आदींसोबत पंधरा ते वीस निसर्गप्रेमी तरुणांनी आता पर्यावरणाचे संतुलन राखण्यासह हॉर्नबिल वाचवा मोहीम हाती घेतली आहे. त्यातूनच प्रतीक मोरे यांनी देवरूख येथे ‘हॉर्नबिल फूड प्लान्ट नर्सरी’ची उभारणी केली आहे. ही उभारणी करण्यासाठी या सर्व निसर्ग व पक्षीप्रेमींना मोठी मेहनत घ्यावी लागली आहे. हॉर्नबिलचे घरटे असलेल्या ठिकाणी विणीच्या हंगामात तासन्नतास तिष्ठत निरीक्षणासह त्याच्या हालचाली टिपण्याकरिता मेहनत घ्यावी लागली. या दरम्यान विणीमध्ये हॉर्नबिलने बांधलेल्या त्याच्या आगळ्यावेगळ्या घरट्यात पिलांसाठी आणलेले खाद्य भरविताना त्यातून पडलेल्या बिया व घरट्यातील विष्ठेतून पडलेल्या बिया विष्ठेसह जमा कराव्या लागल्या आहेत आणि हे सर्व साहित्य रुजविण्याचा उपक्रम अर्थातच हॉर्नबिल फूड प्लान्ट नर्सरी’ सुरू केली आहे. त्यासाठी स्वतंत्र नर्सरी उभारून सुरुवातीला ट्रे मधून बीबरोपण करून त्याचे अंकुरात रूपांतर करीत हळूहळू छोट्या रोपट्यासह भविष्यातील मोठ्या वृक्षांची लागवड करण्याचा हा उपक्रम देशातील पहिला असल्याचे मत पक्षीमित्रांकडून व्यक्त होत आहे.

पक्षांची विष्ठा गोळा करून बीजारोपण
कोलकाता येथील पक्षी अभ्यासक निरीक्षक पूजा पवार यांच्यासह चिपळूण व देवरूख येथील पक्षीमित्रांचा हॉर्नबिल जीवनमान विषयक अभ्यास सुरू आहे. पवार यांनी चार राज्यात भटकंती करून अभ्यास सुरू ठेवला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 26/Nov/2024