खेड : शहरात प्लास्टिक बंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. नगर प्रशासनाची यंत्रणा विधानसभा निवडणूक प्रक्रियेत गुंतल्याचा फायदा उठवत सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. नगर प्रशासनाची कारवाईची मोहीम थंडावल्याने व्यावसायिकांसह काही व्यापाऱ्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे. नगर प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरास बंदी असतानाही शासनाचे आदेश पायदळी तुडवत प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. यापूर्वी नगर प्रशासनाने प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांना दणका दिला होता. मात्र, कारवाईची मोहीम तूर्तास थंडावल्याचा फायदा उठवत पुन्हा प्लास्टिकचा वापर सुरू झाला आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांना दणका देण्याची मोहीम घेण्यात आली होती. मात्र त्यात विधानसभा निवडणुकीमुळे या माहिमेत खोडा पडला. याचा फायदा काही व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी उठवला असून, प्लास्टिक पिशव्यांचे साठे करत सर्रासपणे विक्री केली जात आहे.
शहरातील काही व्यावसायिकांकडे प्लास्टिक पिशव्यांचे साठे करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. बहुतांश विक्रेत्यांकडून ग्राहकांना प्लास्टिक पिशवी उपलब्ध करून दिली जात आहे. यामुळे शहरात प्लास्टिक बंदीचे पुरते तीनतेराच वाजले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रशासकीय यंत्रणा मोकळी झाल्यानंतर नगरप्रशासन प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांना कोणता दणका देते, याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे. नगर प्रशासनाने प्लास्टिक विरोधातील मोहीम गतिमान करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 26/Nov/2024













