प्रशांत यादवांचा पराभव जिव्हारी : मुराद अडरेकर

चिपळूण : चिपळूण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी विरोधकांसमोर कडवे आव्हान उभे केले. यादव यांचा पराभव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह महाविकास आघाडीच्या जिव्हारी लागला. याबाबत पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घेतलेल्या कष्टाचे आभार मानले.

अटीतटीच्या लढतीत यादव यांचा निसटता पराभव झाला; मात्र पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी केले. चिपळूण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव विरुद्ध महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्यात ‌काँटेकी टक्कर‌ पाहायला मिळाली. त्यावर अडरेकर म्हणाले, विधानसभेत फार अटीतटीची लढत आमच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी दिली. सर्वांनी खूप परिश्रम घेतले. त्यातून आज जरी आमच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी हा पराभव नाही. पक्षफुटीनंतर विद्यमान आमदारांनी हजारो कोटींच्या विकासासाठी आणलेला निधी आणि त्यांचा जनतेतील असलेली संपर्क या जोरावर त्यांचा विजय झाला; परंतु आमच्या पक्षाचे उमेदवार यांनी फार कमी वेळेत एक नवीन दूरदृष्टी आणि रोजगाराच्या माध्यमातून जमवलेला लोकसंपर्क यांचे कष्टाचे फळ आणि पराजय होऊन देखील विजयी झाल्यासारखं आहे.

कार्यकर्त्यांनी खचून न जाता मोठ्या उत्साहाने पुन्हा जोमाने काम करावे. पक्ष संघटना अधिक जोमाने वाढवणार आणि येणाऱ्या काळात अधिक सक्षमतेने आम्ही कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाऊ व यश प्राप्त करू, अशी ग्वाहीदेखील अडरेकर यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 26-11-2024