रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांच्या विजयात सोशल मीडिया प्रभावी ठरला, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा, जिल्हा सोशल मीडिया संयोजिका वर्षाराजे निंबाळकर यांनी केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जनतेचा विश्वास निर्विवाद सिद्ध करत सत्ता कायम राखली. यापैकी बहुचर्चित रत्नागिरी विधानसभेत ४१ हजारहून अधिक मताधिक्याने महायुतीचे उमेदवार उदय सामंत निवडून आले. याबाबत प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, महायुती म्हणून वरिष्ठांनी निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केल्यापासून जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात झाली. यानंतर उमेदवार जवळपास निश्चित असले तरीही अधिकृतपणे उदय सामंत यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर रत्नागिरी विधानसभा क्षेत्रात फक्त महायुतीचा बोलबाला राहील अशा प्रकारे सोशल मीडियाने काम केले. त्या पुढे म्हणाल्या, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तरुण मतदारांनी मतदान केले. तरुणाईचा कौल विकासाच्या प्रवाहाला मिळावा यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध अभियाने राबवून त्यांनी उदय सामंत यांनाच मतदान करण्यासाठी उद्युक्त करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. सरकारच्या योजना, विकासकामे रोज लोकांपर्यंत पोहोचल्याने लोकांची मानसिकता सकारात्मक झाली आणि अन्य कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन नागरिकांना सर्वांगीण विकासाची दिलेली शाश्वती यांमुळे महायुतीचा व उदय सामंत यांचा विजय सुकर व निश्चित झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 26-11-2024














