रत्नागिरी : रखडलेल्या कंत्राटी शिक्षक भरतीला लवकरच मिळणार मुहूर्त

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकांचा निकालही लागला आहे. यानंतर आता आचारसंहिता संपुष्टात येणार असून रखडलेल्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सोमवारी याबाबत स्थानिक डीएड, बीएड बेरोजगारधारकांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. आठवडाभरात ही प्रक्रिया होईल, असे सांगण्यात आले. जिल्ह्यात ५०० जागा रिक्त आहेत.

शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक किंवा डीएड-बीएड झालेल्या बेरोजगारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक देण्याचा निर्णय ५ सप्टेंबर रोजी घेतला. त्यानुसार आदेश काढला गेला. कत्राटी तत्वावर नेमणूक मिळाल्यानंतर संबंधित शिक्षकाला शासनाकडून महिन्याला १५ हजार रुपये हे मानधन मिळणार आहे. वर्षाला १२ रजा असणार आहेत, जिल्हास्तरीय समितीकडून याची पडताळणी करून या उमेदवारांना त्वरित नियुक्ती देण्यात यावी, असे आदेशात म्हटले होते.

या आदेशाला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेत २५ सप्टेंबर रोजी राज्यभर हा शासन निर्णय रद्द व्हावा म्हणून शाळा बंद ठेवून आंदोलन केले होते. जे शिक्षक या निर्णयाला विरोध करत होते त्याच अनेक शिक्षकांनी स्वतः च्या पत्नीचा अर्ज या भरती प्रक्रियेत दिला आहे. यामुळे हे वातावरण आणखी चिघळलं होतं.

जिल्ह्यात साधारणः ६०० च्या आसपास रिक्त जागा आहेत. या जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. परंतु, आलेल्या अर्जामध्ये परजिल्ह्यातील शिक्षकांच्या पत्नी तसेच परजिल्ह्यातील बेरोजगारांचे हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले होते.

ही प्रक्रिया कशी राबवावी यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. या मार्गदर्शन पत्रात उमेदवार हा स्थानिक असावा असे स्पष्ट म्हटलं आहे. ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा एक अर्ज आल्यास डीएड तसेच बीएड अर्हतमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांचा विचार करावा. रिक्त पदं असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात यावा. तर तालुक्यात देखील उमेदवार मिळाला नाही तर जिल्ह्यातील अन्य उमेदवारांचा विचार व्हावा असे या पत्रात म्हटलं आहे.

मात्र काही ठिकाणी पोलिस पाटील व सरपंचानी परजिल्ह्यातील उमेदवारांना रहिवाशी असल्याचा दाखला दिल्याने वादाचा प्रसंग निर्माण झाला होता.

ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना विधानसभेची आचारसंहिता सुरू झाली. यामुळे ही भरती प्रक्रिया रखडली. आता आचारसंहिता संपुष्टात आली आहे. यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी सोमवारी स्थानिक बीएड, बीएड बेरोजगार संघटनेने जिल्हा प्रशासनाची भेट घेतली. यावेळी या बेरोजगारधारकांना आठवडा भरात ही भरती प्रक्रिया सुरू होईल, असे सांगण्यात आले. जिल्ह्यात ६०० जागा रिक्त होत्या. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १०० जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले होते. आता उर्वरित ५०० जणांना नियुक्तीपत्र आठवडाभरात मिळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील कंत्राटी तत्त्वावर प्राथमिक शिक्षक भरती अंतिम टप्प्यात आहे. या प्रक्रियेला आचारसंहितेचा अडथळा आला होता. आता मात्र ही प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण होईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. या प्रक्रियेत संपूर्ण स्थानिकच उमेदवारांना घ्यावे, ही आमची मागणी आहे. – सुदर्शन मोहिते, अध्यक्ष डीएड, बीएड बेरोजगार संघटना, रत्नागिरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 26/Nov/2024