संगमेश्वर : सायले बौद्धवाडीत ‘त्या’ वहाळामध्ये पाणीच नाही

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील सायले बौद्धवाडीची पाणीयोजना ज्या वहाळावरून राबवण्यात आली आहे तिथे कमी पाणी साठलेले आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शासनाने सुरू केलेली जलजीवन योजना सध्यातरी गटांगळ्या खात आहे. संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत सायले परिक्षेत्रातील बौद्धवाडी सार्वजनिक पाणीपुरवठा आडाशेजारी पाण्याचा साठा व्हावा, या उद्देशाने एक बंधारा बांधण्यात आला आहे. त्या बंधाऱ्यात दीड फूटही पाणी साठलेले नसते. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक क्षितिज नागवेकर यांच्यासह सदस्य आणि अभियंते यांच्याशी स्थानिक ग्रामस्थांनी चर्चा केली. ओढ्यातून पाणी वाहत असते तोवर बंधाऱ्याची उंची वाढवा आणि लोखंडी दरवाजे (झडप) लावा जेणेकरून तिथे पाणी साचेल, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती.

त्यावेळी आश्वासन देऊन गेलेले अभियंते आणि ठेकेदार यांनी पुढे सूचनांकडे दुर्लक्ष केले. आता ओढ्यातल्या पाण्याची पातळी कमी झाली असून, ओढा वाहात नाही या परिस्थितीत एवढा मोठा प्रकल्प तिथे उभारण्यात आला आहे. त्यावर लाखो रुपये खर्चही झाले आहेत. त्याचा फायदा स्थानिकांना होणार नसेल, तर त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. पाणी राहिलेच नाही तर आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढेल, याबाबत संबंधितांशी ग्रामस्थांनी चर्चा केल्यावर कामाची विले थकीत असल्यामुळे वाढीव काम होणार नसल्याचे पुढे आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 26/Nov/2024