सावर्डे : संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन गायी मृत पावल्या आहेत. त्या गायी रामचंद्र लाखण, अंजली लाखण यांच्या आहेत. या प्रकारामुळे या गावातील शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला वेळीच पकडण्यासाठी वन विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
रामचंद्र लाखण यांच्या खिल्लारी जातीच्या एक वर्षाच्या पाडीवर रविवारी (ता. २२) सकाळी ११ च्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. यामध्ये जखमी झालेल्या पाडीला वाचविण्यासाठी सरंद माखजन येथून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले होते; मात्र पाडीला वाचवण्यात यश आले नाही. देवरूख येथून वनविभागाचे अधिकारी कडूकर आणि तेली यांनी दीड दिवसानंतर भेट देऊन मृत पाडीचा पंचनामा केला. त्या पाठोपाठ मंगळवारी (ता. २४) अंजली लाखण यांची दोन वर्षांची जर्सी गाय बिबट्याने घरासमोरच मारली. पोलिसपाटील राकेश सुर्वे यांनी ही बाब वनखात्याच्या निदर्शनास आणून दिली. पशुवैद्यकीय अधिकारी वेळेत न आल्यामुळे शेतकऱ्यांवर पंचनामा होईपर्यंत रात्रभर मृत गायीचा पहारा देण्याची वेळ आली होती. वनविभागाने या प्रकारांकडे वेळीच लक्ष देऊन उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांना त्वरित योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी सतीश सुर्वे, राजेंद्र कदम, सुजित सुर्वे, सुनील सुर्वे, दत्ताराम सुर्वे, दीपक सुर्वे व सचिन सुर्वे या शेतकऱ्यांनी केली आहे.
वाशिष्ठी दूध डेअरीमुळे या भागात दुग्ध व्यवसाय फोफावता आहे. संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी, महिलांनी बँक, बचत गटांच्या माध्यमातून गायी खरेदी केल्या आहेत. या व्यवसायातून शेतकऱ्यांना चार पैसे मिळत आहेत. विकास सुर्वे, माजी उपसभापती, देवरूख
काही महिन्यांपूर्वी कुंभारखाणी बुद्रुक ग्रामपंचायत आणि वनविभागाचे वनपाल मुल्ला यांनी झालेल्या प्रकाराबाबत विस्तृत चर्चा केली होती. हे प्रकार होऊ नयेत यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे; मात्र त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. राकेश सुर्वे, पोलिस पाटील, कुंभारखाणी बुद्रुक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 26/Sep/2024